जुन्नर तालुक्यात बिबट्यांची अमाप संख्या; रोज होतात हल्ले; तीन तालुक्यातील ४१ नागरिकांचा मृत्यू ; १४० जखमी
1 min read
जुन्नर दि.६ :- जुन्नर तालुका हा बिबट्यांचे माहेरघर झाल्याने या रोज बिबट्यांचे पाळीव प्राणी व माणसांवरती हल्ले होत आहेत. भक्षाच्या शोधात बिबटे दिवसा खुलेआम फिरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण आहे.
जुन्नर वनविभागातील बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी मागणी जुन्नर तालुका शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख माऊली खंडागळे यांनी मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
मागील काही वर्षांपूर्वी बिबट संघर्षावर उपाययोजना म्हणून जुन्नर वनविभागाने बिबट्यांसोबत सहजीवन जगण्याचा पर्याय नागरिकांसमोर ठेवला तो नागरिकांनी स्वीकारला देखील. पण आता हा प्रश्न सहजीवन जगण्याच्या पलीकडे गेला आहे.
२००१ पासून जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे वास्तव्य प्रामुख्याने वाढले. या काळात तालुक्यातील पूर्व भागातील अनेक ठिकाणी बिबट्यांकडून मानवी हल्ल्यांच्या घटना घडल्या. २००१ ते २०१० या काळात जुन्नर वनविभागात बिबट मानव संघर्ष अधिक तीव्र झाला.
त्यानंतरच्या काळात नागरिकांनी देखील बिबट्यांना स्वीकारले आणि बिबट्यांसोबत सहजीवन जगण्याचा मार्ग पत्करला. मात्र बिबट्यांचे हल्ले आणि बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणतेही भरीव प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
बिबट्यांकडून होणारे मानवी व पशू धनावरील हल्ले, बिबट्यांची वाढती संख्या रोखण्याबाबत शासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होताना पाहायला मिळत नाही. शासनाकडून पाहायला मिळणारी उदासीनता यामुळे पुढील काही वर्षांत जुन्नर तालुक्यात बिबट मानव संघर्ष अधिक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिरूर,आंबेगाव, खेड जुन्नर तालुका) २००१ ते २०२४ याकाळात बिबट्यांच्या हल्ल्यात एकूण ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४० जण जखमी झाले आहेत.
हल्ल्यात ४१ जणांचा बळी जात असेल तर त्या भागात शासनाने किती तत्परतेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे?याबद्दल ना कुठे नव्याने धोरण ठरविले जाते, ना त्याबाबत काही ठोस पावले उचलली जातात.
“जुत्रर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहे. राज्य सरकारने वेळीच प्रभावी उपाययोजना करावी. नाही तर भविष्यात जुन्नर वनविभागात मानव बीबट संघर्ष तीव्र होईल. बिबट्यांचं जगणं महत्त्वाचं की माणसांचं? हे आता राज्य सरकारने स्पष्ट करावं.”
माऊली खंडागळे, शिवसेना तालुका प्रमुख (ठाकरे गट)
“शिरूर लोकसभा मतदार संघात ४०० ते ५०० बिबटे असून यावरती केंद्र सरकार ने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मी संसदेत बिबट्यांचा प्रश्न उपस्थित केला होता.यावर प्रजनन रोखणे हा उपाय असून यावर केंद्र सरकारने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे अन्यथा पुढील काळात बिबट्यांचा प्रश्न अधिक गंभीर होईल.”
डॉ.अमोल कोल्हे, खासदार शिरूर लोकसभा मतदार संघ
जुन्नर तालुक्याच्या बिबट्यांचा इतिहास साधारण पणे जुन्नर तालुक्यात पंचवीस ते तीस वर्षापूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदं गावालगत येत असत परंतू त्यांचा वावर हा शक्यतो डोंगरात असणा-या गुहा, कपारी यामध्ये असे, त्यावेळी असणारी जंगलांची मुबलकता, जंगलात असणा-या शिकारीयोग्य प्राण्यांची ऊपलब्धता त्यामुळे ही श्वापदं मानवी वस्तीपर्यंत येत नव्हती.
वाघांची व ईतर श्वापदांची संख्या नगण्य झाली परंतु बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढच होत गेली. बिबट्या हा एक मांजरवर्गीय प्राणी, अतिशय चपळ, जवळजवळ चाळीस किलोमिटर परिघामध्ये आपले साम्राज्य वसवतो. काळ बदलला जमिनीचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे वृक्षतोड वाढली, परिणामी जंगलक्षेत्र कमी होऊ लागले.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगावजोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे जमिनी, जंगले व गावे बुडाली, माणसांचा व पाळीव जनावरांच्या पूनर्वसनाचा प्रश्न शासनाने काही प्रमाणात सोडवला परंतू जंगली श्वापदं त्यांचे काय? त्यांचा विचार कोणीही केला नाही, या पाचही धरणात गेलेली जमीन, जंगल याचा विचार करता.
जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचा बोजवारा उडाला आणि जुन्नर तालुक्याला वरदान ठरणारी पाचही धरणे आणि कालव्यांचे जाळे यामुळे जमिनी चांगल्यापैकी ओलीताखाली आल्या आणि तालुक्यातील एक आणि शेजारील तालुक्यातील साखर कारखानदारीमुळे शेतकरी कमी श्रमाच्या ऊस शेतीकडे वळला, आणि सैरभैर झालेल्या बिबटयांना मानव निर्मीत वस्तिस्थान तयार झाले.
आणि त्यांचा मानवी वसाहतीजवळचा वावर वाढू लागला आणि याच ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडली. ऊसशेतीजवळ असणा-या पाळीव जनावरांवर बिबट्याचा उदरनिर्वाह होऊ लागला, परंतू येथेही पाळीव जनावरे बंदिस्त होऊ लागल्याने एकट्या-दुकट्या व्यक्ति, लहान मुले, शाळेत येणारा जाणारा विद्यार्थी वर्ग, शेतात काम करणारा महिला वर्ग हा या बिबट्याच्या नजरेत बसू लागला.
दररोज कुठेनाकुठे बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकू लागली आहे, आज काय तर माणसांवर हल्ला तर उद्या पाळीव प्राण्यांवर हल्ला, आजकाल तर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारावरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत, अशा बातम्या वर्तमानपत्रात ठळक अक्षरात रोज येऊ लागल्या आहेत.
*वनविभाग अपयशी*
वनखात्याने शेकडो बिबटे पकडून काहींना उपचार करून पुन्हा सोडून दिले आहेत तर काही बिबटे जुन्नर येथील माणिकडोह निवारा केंद्रात आहेत. अपूरा व अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग ही ढोबळ कारणे व फक्त ज्या विभागात बिबट्या आढळला त्या भागात पिंजरा लावणे, जनजागृतीसाठी फ्लेक्स बोर्ड लावणे, एकट्यादुकट्याने फिरु नये, ऊसक्षेत्रातून जातायेताना मोठमोठयाने आवाज करणे, गाणी म्हणणे.
काठीला घुंगरे बसवून त्याचा आवाज करणे असे सुचना फलक लावणे एवढेच काम वनविभाग करते, जुन्नर तालुका बिबट्या प्रवणक्षेत्र जाहीर असून तालुक्यात बिबट्यां प्रवणक्षेत्र जाहीर असून तालुक्यात बिबट्यांची संख्या किती आहे ,याची माहीती खुद्द वनविभागालाही नाही. बिबट्या पकडून त्याला माणिकडोह निवारा केंद्रात उपचार करून परदेशातील प्राण्यांप्रमाणे जीपीआरएस यंत्रणा बसविल्यास खात्रीने प्रत्येक बिबट्याचा निश्चित ठावठिकाणा समजण्यास मदत होईल व बिबट्यांची संख्या निश्चितपणे कळण्यास मदत होईल.
परंतु आधुनिक पध्दतीकडे ना शासनाचे लक्ष, ना वनविभागाचे त्यांचे काम पारंपारीक पध्दतीनेच चालू आहे. काही लोकांचा असा सूर निघतो कि बिबट्याचे संपूर्ण उच्चाटन करून टाकणे असा आहे परंतू हे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर असा प्रकार झाला. शासनातील तज्ञ,वन्यजीवविभागातील तज्ञ व संशोधक यांनी यावर एकत्र बसून काहीतरी ठोस उपाय काढणे आवश्यक आहे.
नाहीतर भविष्यात बिबट्या हा चित्रात दाखविण्यापूरताच उरेल आणि त्याअगोदर बिबट्या हा जंगली प्राणी खाद्य आणि पाण्यावाचून पिसाळल्यासारखा करणार व पाळीव प्राणी व मानवी वस्तीवर हल्ले करणार आणि त्याचा परिपाक म्हणजे वनकर्मचा-यांवर होणारा जनतेचा रोष, या सर्व बाबींचा शासनाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.