मराठा आरक्षणाच्या दिंडीमुळे पुण्यात वाहतुकीचे माेठे बदल
1 min read
पुणे दि.२३:- मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची दिंडीची आता मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज मंगळवारी (ता. २३) हा मोर्चा रांजणगाव येथून कोरेगाव पार्कमार्गे खराडी येथे येणार आहे. खराडीत जरांगे-पाटील यांचा मुक्काम असणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठाबांधव सहभागी झाले आहे. मोर्चा पुणे मुक्कामी असल्याने मंगळवारी दुपारपासूनच नगर येथे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून, तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला – न्हावरे- शिरूरमार्गे जातील.
वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला न्हावरामार्गे शिरूर ते नगर जातील, तर पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक, पुढे सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला – न्हावरे -शिरूरमार्गे जातील.
यासाठी पुणे पोलिसांनी काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाची दिंडी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून पुढे लोणावळ्यात जाईपर्यंत मोर्चा मार्गावर व परिसरात गरजेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. हा मोर्चा बुधवारी (ता. २४) पिंपरी-चिंचवडमार्गे लोणावळा येथे जाणार आहे, असे वाहतूक विभागाने सांगितले.