बेल्हे येथील पुष्करणीला बोरीच्या विद्यार्थ्यांची भेट

1 min read

बेल्हे दि.५:- सितारंग चॅरिटेबल सोसायटीचे श्रीमती सिताबाई रंगुजी शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोरी येथिल इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी बेल्हे येथील ऐतिहासिक यादवकालीन पुष्करणीला भेट दिली. प्राचीन सातवाहन कालीन कल्याण- नाणेघाट जुन्नर- प्रतिष्ठान या मार्गावर बेल्हे गाव वसलेले आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे व पूर या गावांमध्ये प्राचीन पुष्करणी स्वरूपाच्या बारवा आहेत. बेल्हे येथील पुष्करणी चौकोणी आकाराची असुन तिची लांबी रुंदी ५०×४० फुट असुन पुष्करणीत उत्तरण्यासाठी पुर्व – पश्चिम दोन्ही बाजुंनी पाय-या आहेत. पुष्करणी मध्ये एकूण १८ कोनाडे देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठी तयार केलेले दिसतात. सध्यस्थितीत या पुष्करणीची अवस्था अत्यंत खराब आहे. बाजूच्या दगडी भिंती ढासळल्या असुन मोठमोठ्या शिळा अस्ताव्यस्त पडल्या आहेत. हा ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वारसा पुरातत्व खाते, सांस्कृतिक व पर्यटन विभाग आणि बेल्हे गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून याचे जतन व सवंर्धन करून या बारवेला तिचे मुळ स्वरूप प्राप्त करून दयावे अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली.यामुळे पुष्करणीचे मुळ स्वरूप प्राप्त होऊन बेल्हे गावाच्या पर्यटनास नक्कीच हातभार लाभेल. शिवाय प्राचीन सांस्कृतिक वारशाचे सवंर्धन होण्यास मदत होईल. या अभ्यास सहलीचे नियोजनमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. डी. गुंजाळ व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. गवारी यांनी केले. यावेळी प्रा.व्ही. एच. गाडगे, प्रा.एम. आर. महाले व प्रा. एम. एस. जाधव उपस्थित होते. तसेच इतिहास विभागातील २५ विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक पुष्करणीला भेट दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे