ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा बोरी बु गावाला लाभला:- आमदार अतुल बेनके

1 min read

बेल्हे दि.४:- पर्यटन तालुका जुन्नरच्या पूर्व पट्ट्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बोरी बु|| गावास ‘ गावपर्यटन ‘ या संकल्पनेअंतर्गत पर्यटकांच्या पहिल्या गटाने नुकतीच गावाला भेट दिली. शिवजन्मभूमी जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी त्यांच्या धावत्या भेटीमध्ये पर्यटकांचे स्वागत केले. यावेळी पर्यटन व वारसा संवर्धन संस्थेचे पदाधिकारी – अध्यक्ष अमोल कोरडे, उपाध्यक्ष रंजन जाधव, पुष्पा कोरडे, अर्जुन जाधव, संतोष जाधव, आयोजक ऊर्वी पब्लिक ट्रस्टच्या आर्किटेक्ट अमृता नायडू आणि धीरज पाटील यांसह गावाच्या सरपंच वनिता डेरे, उपसरपंच दिनेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश औटी आणि गावकरी उपस्थित होते.जुन्नर तालुक्यामधे असलेल्या जिएमआरटी प्रकल्पामुळे उद्योगिकिकरणास थोडे निर्बंध येतात. यामुळे शेतीसह उत्पन्नाचा एक पर्याय म्हणून पर्यटनाकडे गावकऱ्यांनी बघावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले. गावभ्रमंतीचा अनुभव घेतल्यानंतर पर्यटकांच्या दृष्टीने काय गोष्टी आवश्यक आहेत. याबद्दलचा अभिप्राय पर्यटकांनी द्यावा, ज्याचा विचार जुन्नर पर्यटन आराखड्यामध्ये करता येईल असे आवाहन आमदार अतुल बेनके ‍यांनी केले. जुन्नरमधील पर्यटनाच्या संधी आणि बिबट्या – माणूस याचे अनोखे सहजीवन याबद्दल तहसीलदारांनी पर्यटकांसोबत संवाद साधला.चिंचवड येथील ऊर्वी पब्लिक ट्रस्टच्या ‘ खेडूत ‘ या उपक्रमाअंतर्गत आणि पर्यटन व वारसा संवर्धन संस्था, बोरी बु|| यांच्या सहयोगाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरातील १७ पर्यटकांचा यामधे सहभाग होता. ग्रामीण जीवनशैली व संस्कृतीचा जवळून अनुभव पर्यटकांना घेता आला. औक्षण व फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने गावकऱ्यांनी पर्यटकांचे स्वागत केले. ट्रॅक्टर सफारी, दूध काढणी, कुंभारकाम या गोष्टी पर्यटकांनी प्रत्यक्ष करून पाहिल्या. गावातील जुने वाडे, मंदिरांना भेटी देऊन, पारंपरिक शेंगुळीच्या जेवणाचा आस्वाद त्यांनी घेतला. कुंभारकाम, केरसुणी विणण्याची कला यांचेही प्रात्यक्षिक गावातील कारागिरांनी पर्यटकांना दाखवले आणि आपल्या मालाची विक्रीही केली. गावाचा इतिहास आणि संरचना याबद्दल संदीप जाधव व आनंदी कोरडे यांनी माहिती दिली.गावाचा लाखोवर्षे जुना इतिहास – परंपरांचे संवर्धन होऊन त्या लोकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यायोगे गावामधे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्था, बोरी बु|| कार्यरत आहे. तर उर्वी पब्लिक ट्रस्ट ही पुण्यातील संस्था असून सस्टेनेबल आर्किटेक्चरच्या क्षेत्रात काम करते. ट्रस्टने ‘ गावभ्रमण ‘ या अनोख्या संकल्पनेद्वारे निवडक २० गावातील ग्रामीण जीवन, पारंपरिक बांधकाम रचना, पुरातन स्थापत्य, परंपरा यांची पर्यटकांना ओळख करून दिली आहे. याच उपक्रमातून बोरी बु|| गावास आधीदेखील पर्यटकांनी भेट दिली आहे. या दोन्ही संस्था एकमेकांच्या सहयोगाने बोरी बु|| गावामधे पर्यटनाच्या दृष्टीने गावचे लोकजीवन जगाच्या पटलावर आनायचे काम करत आहेत.गावातील लोकजीवन-संस्कृतीचा अनुभव पर्यटकांना घेता व्हावा आणि स्थानिक कारागिरांच्या कलेला, शेतकऱ्यांना एक व्यासपीठ गावातच उपलब्ध व्हावे अशा उद्देशाने गावामधे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी बोरी महोत्सव, कारागिरांच्या कलेचे पुण्यामध्ये प्रदर्शन आयोजीत केले गेले होते. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी महोत्सव, द्राक्ष महोत्सव, वनमहोत्सव, हुरडा – खाद्य महोत्सव असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभाग, वनविभाग,पर्यटन संचलनालय आणि डेक्कन कॉलेज, पुणे यांचेही गावास वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. स्थानिक लोकजीवन आणि पर्यटनासाठी आवश्यक बाबींचा मेळ घालण्यासाठी गावाने जुन्नर तालुक्यात प्रथमच ‘ गाव पर्यटन आराखडा ‘ तयार केला आहे. आमदार अतुलजी बेनके आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची पर्यटनग्राम होण्याकडे वाटचाल सुरू आहे. दोघांच्या प्रयत्नांतून गावातील पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रागैतिहासिक काळातील पुरावशेशांचे जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालय उभारणीकरिता पाठपुरावा सुरू आहे.बोरी गावाच्या संस्कृतीचा जवळून अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी आवरजून भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्थेने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे