समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.१:- पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल येथे करण्यात आलेले आहे.प्रदर्शनाचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा आहे. आरोग्य,जिवन,शेती/कृषी, दळणवळण आणि वाहतूक व संगणकीय विचार असे पाच उपविषय ठरवण्यात आले आहेत.या विषयांपैकी कोणत्याही एका उप विषयावर आधारित निम्न प्राथमिक स्तर (इयत्ता पहिली ते पाचवी), प्राथमिक स्तर .(इयत्ता सहावी ते आठवी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या (नववी ते बारावी) शालेय विद्यार्थी व शिक्षक प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करून विज्ञान प्रदर्शनात सादर करणार आहेत. हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २ व ३ जानेवारी २०२४ रोजी समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे घेण्यात येणार आहे.या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये प्रकल्प स्पर्धेसोबतच संगणकीय सादरीकरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,भित्तिपत्रक (पोस्टर मेकिंग) स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे आगस्त्या फाऊंडेशन, आयुका द्वारे दिवसभर विज्ञानवाहिनी मार्फत विज्ञान खेळणी प्रात्यक्षिक आणि सायंकाळी दुर्बीनी द्वारे अवकाश दर्शन देखील दाखविण्यात येणार आहे.हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याने यामध्ये टाकाऊ पासून उपयुक्त वस्तूंचे प्रदर्शन, विज्ञानातील चमत्कार, अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग, गणितीय गमती-जमती व गप्पा गणित संशोधकांशी या विषयांवर आधारित तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनऊ विद्यापीठा चे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, जलदिंडी चे संस्थापक डॉ.विश्वास येवले, बालभारतीचे मा.विशेषाधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे, युवा शास्त्रज्ञ डॉ.प्रतिक मुणगेकर, डॉ.संपत सूर्यवंशी. अगस्त्या फाउंडेशनचे रमेश हिटनल्ली, पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे सुनील पोटे, डॉ.सदानंद राऊत आदी मान्यवर या प्रदर्शनासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधनार आहेत. प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्या वैशाली आहेर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे