२० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी जुन्नरमध्ये वकिलाला अटक; जामीन मिळवून देण्यासाठी मागितली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

1 min read

जुन्नर दि.३०:- गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील असे सांगून २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जुन्नरमधील वकिलावर गुन्हा दाखल करून अटक केली.

शिवम गजानन नायकोडी (वय ३०) असे या वकिलाचे नाव आहे. यासंदर्भात माहिती अशी की, तक्रारदार हे ७० वर्षांचे असून त्यांच्या मुलाला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक केली होती. शिवम नायकोडी हे त्यांचे वकिल होते.

त्यांच्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे तक्रारदार यांना सांगितले. त्यासाठी तपास अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्याची ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकाऱ्याला २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

वकिलाने लाच मागितली तरी त्यात तपासी अधिकाऱ्याचा सहभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आला नाही. लाच मागितल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्याची पडताळणीही झाली होती. मात्र, कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. परंतु, लाच मागितली गेली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपेश जाधव, पोलिस अंमलदार माने, कोमल शेटे आणि चालक पोलिस हवालदार कदम यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे