मंचरमध्ये लाच प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक व पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; मागितली होती ४० हजार रुपयांची लाच
1 min read
मंचर दि.२५:- अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या मंचर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी (दि.२३) अटक केली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंके (वय ४५), पोलीस शिपाई संदीप भिमा रावते (वय ३६) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनयमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
या तरुणाविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तरुणाचे वाहन जप्त केले होते. वाहन परत करण्यासाठी साळुंके आणि रावते यांनी तरुणाकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तडतोडीत आठ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. या संदर्भात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सापळा लावून पोलीस शिपाई रावते याला पकडण्यात आले. चौकशीत साळुंके ने रावते याच्यामार्फत लाच स्वीकारल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक विद्युलत्ता चव्हाण यांनी ही कारवाई केली.