विवाहाच्या आमिषाने तरुणाची २५ लाखांची फसवणूक

1 min read

पुणे दि.२४:- विवाहविषयक – संकेतस्थळावर झालेली ओळख एका तरुणाला महागात पडली. उत्तर प्रदेशातील एका तरुणीने विवाहाच्या आमिषाने एका तरुणाची २५ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार खुशबू जैसवाल (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण आणि आरोपी तरुणी जैसवाल यांची एका विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झाली होती. तरुणाने जैसवालकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला.

त्यानंतर तिने विवाहास तयारी दर्शविली. जैसवालने गेल्या पाच महिन्यात कौटुंबिक अडचण, तसेच वैद्यकीय उपचारांच्या बहाण्याने तरुणाकडून वेळोवेळी २५ लाख ६६ हजार २२६ रुपये घेतले. त्यानंतर तिने तरुणाशी संपर्क तोडला. तिने तिचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे