पदमश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांची समर्थ संकुलाला सदिच्छा भेट; परसबाग, वनौषधी उद्यान व नक्षत्र उद्यान ची केली पाहणी

1 min read

बेल्हे दि.२०:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे या शैक्षणिक संकुलास बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, डॉ.महेश भास्कर, प्रा.रुस्तुम दराडे, बाळकृष्ण झावरे,सकाळ चे वार्ताहर राजेश कणसे आदि मान्यवर उपस्थित होते.

समर्थ शैक्षणिक संकुलात तयार केलेल्या परसबागेला भेट देत घरच्या घरी परसबाग बनवताना देशी वाणाची शेती आरोग्याला हितकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुर्वेदिक व वनौषधी वनस्पती उद्यानाची पाहणी केली.या आयुर्वेदिक उद्यानामध्ये २०० दुर्मिळ आयुर्वेदिक व वनऔषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अक्कलकाढा, अडुळसा, आंबेहळद, आले, लसूण, गुळवेल, जेष्ठमध, उंबर, पानफुटी, देशीगुलाब, वेखंड, वाळा, मोगरा, अर्जुन, दालचिनी, जास्वंद,

निरगुडी, तुळस, अशोक, किडामार, सागरगोटी, गुडमार, काळी मुसळी, डिकमली, शिकेकाई, माईन मुळा, रिठा, ब्राम्ही यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश करण्यात आलेला आहे.

दुर्मिळ वनौषधी व वनस्पती यांची लागवड करून संगोपन करणे ही प्रक्रिया महाविद्यालयाने सुरू केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद असल्याचे राहिबाई म्हणाल्या.

संकुलातील नक्षत्र उद्यानामध्ये विविध प्रकारची २७ वृक्ष आहेत त्यांची पाहणी केली.राहिबाई पोपेरे या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत.देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स.२०२० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अधिक उत्पादनासाठी शेतीमध्ये हायब्रीड बियाणे वापरात होते पण मूळ कारणाचा शोध घेतला आणि लक्षात आले की सेंद्रिय बियाणे वापरली तर आरोग्य उत्तम राहते.आणि म्हणून तसा प्रयोग करून पाहिला.तो यशस्वी झाल्यावर त्यांच्या कार्याला सुरुवात झाली.

बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली.त्यात बाइफ संस्थेचेही साहाय्य लाभले. त्यांनी देशी बियाणाची बँक सुरू केली.रानभाज्यांच्या बियासुद्धा या बँकेमार्फत पुरविल्या जातात. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत.ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’ म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला.

बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे .राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे.त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत.

त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय.त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात त्यांच्याकडे पाहायला मिळते.

देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार पुरस्कार दिला.महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे आत्मा प्रकल्पांतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे ‘नारीशक्ती पुरस्कार’ देण्यात आलेला आहे.

संपूर्ण समर्थ शैक्षणिक संकुलातील परिसर पाहून राहिबाई पोपेरे यांनी समाधान व्यक्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीची तळमळ अशीच सुरू ठेवा व संकुलातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरी परसबाग असो किंवा देशी बियाणांची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करा असे आवाहन केले.

यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन राहीबाई पोपेरे यांचा सन्मान करण्यात आला. प्रा.प्रदिप गाडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे