श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठाण वडगाव (कांदळी) आयोजित शिवनेर केसरी २०२३ बैलगाडा शर्यतींच्या स्पर्धेला प्रेक्षकांची हजारोंच्या संख्येने तुडूंब गर्दी

1 min read

वडगाव (कांदळी) दि.१८: श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठाण वडगाव (कांदळी, ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे या ही वर्षी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती अर्थात शिवनेर केसरी २०२३ या मानाच्या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.

या स्पर्धेत पुणे, ठाणे, नगर, नाशिक तसेच सातारा जिल्ह्यातील १२०० बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली होती परंतू स्पर्धा ठराविक दिवसांत पार पाडायची असल्या कारणाने लकी ड्रॉ द्वारे ५४० बैलगाडा मालकांना च संधी देण्यात आली होती.

तीन दिवस रेगूलर बैलगाडे व चौथ्या दिवशी सेपरेट सेमी फायनल आणि तद्नंतर मेगाफायनल अशा प्रकारे चार दिवस या स्पर्धेचे स्वरूप होते. पहिल्या दिवशी प्रथम क्रमांकात राहुल झुंजारराव हांडे निरगुडसर यांचा बैलगाडा फळीफोड तर खेड तालुक्यातील वाफगाव येथील नामवंत बैलगाडा मालक राजू वसंत जवळेकर, आनंद यशवंत वर्पे, कै.सदाशिव महिपती लांडगे या जुगलबंदी चा गाडा दिवसभर घाटाचा राजा चा मानकरी ठरला.

दुसऱ्या दिवशी कै.बबुशा गणाजी भोर, पै.सोहमदादा किरण बागडे, भानुदास देवराम काटे पाटील, दत्ता गराडे या जुगलबंदीचा बैलगाडा प्रथम क्रमांकात फळीफोड तर मावळ तालुक्यातील वारणवाडी येथील सुप्रसिध्द बैलगाडा मालक रामनाथ विष्णू वारींगे, सचिन वाल्मीक नवले या जुगलबंदी ने दिवसभर घाटाचा राजा म्हणून बहुमान मिळविला.

तिसऱ्या दिवशी धोंडिभाऊ गंगाराम कुमकर, जाधववाडी यांचा बैलगाडा फळीफोड तर खेड तालुक्यातील निघोजे येथील प्रसिध्द बैलगाडा मालक बाप्पु तुकाराम आल्हाट, पै.आदेश ज्ञानेश सांडभोर या जुगलबंदीचा बैलगाडा दिवसभर घाटाचा राजा चा मानकरी ठरला.

तीन दिवसांत प्रथम क्रमांकात आलेल्या १३४ बैलगाडा मालकांमधून निवडक ७२ बैलगाड्यांना शेवटच्या दिवशी सेमी फायनल ला संधी देण्यात आली होती. सेमी फायनल ला सर्वात आतून येणारा बैलगाडा अर्थात घाटाचा महाराजा चा बहुमान रामनाथ विष्णू वारींगे, सचिन वाल्मीक नवले या जुगलबंदी ने मिळविला.

हवेली तालुक्यातील फुलगाव येथील नामवंत बैलगाडा मालक बाळासाहेब गणपत साकोरे, संदीप आनंद भोकसे जुगलबंदी चा बैलगाडा मेगा फायनल ला सर्वात आतून येणारा बैलगाडा अर्थात २०२३ या वर्षाचा शिवनेर केसरी या मानाच्या किताबाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेसाठी ४,१६,७२४ रूपये रोख तसेच ५ मोटासायकल, ५ पाऊण तोळ्याच्या अंगठ्या, ५ अर्धा तोळ्याच्या अंगठ्या, ५ वॉशिंग मशीन, ५ फ्रिज, ५ जुंपते गाडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इटालीयन मार्बल पावडर चा अश्वारूढ पुतळा, ३ भव्य दिव्य चषक अशा प्रकारची मोठी बक्षीसे सर्व बैलगाडा मालकांना इनाम म्हणून विभागून वाटप करण्यात आले.

चारही दिवस घाटात प्रेक्षकांची हजारोंच्या संख्येने चौफेर झालेली तुडूंब गर्दी या वर्षीच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. उत्कृष्ठ नियोजन, काटा निर्णय, सुसज्ज धावपट्टी यामुळे प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतल्यामुळे या यात्रेचे संपुर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.

श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठाण च्या सर्व सभासदांनी गेले १५-२० दिवस हि यात्रा भव्य दिव्य स्वरूपात पार पडावी याकरीता अहोरात्र आपार मेहनत घेऊन यात्रा निर्विघ्न पार पाडण्यात सिंहाचा वाटा उचलला.

सर्व बैलगाडा मालक व प्रेक्षकांनी उत्तम प्रकारचे सहकार्य करून यात्रेची शोभा वाढविल्याने शिवनेर केसरी स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच श्री बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष सचिन दादाभाऊ निलख यांनी आभार मानले असून पुढील वर्षी देखील दिवाळी च्या आसपास अश्याच मोठ्या स्वरूपात बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे