तुम्ही नेत्यांच्या तीन-तीन पिढ्या मोठ्या केल्या! ७० वर्षात आमचं वाटोळे करणारे कोण?, आमच्या नादाला लागू नका:-जरांगे पाटलांचा इशारा
1 min read
करमाळा दि.१६:- मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला बुधवार दि.१५ सकाळपासून अंतरवाली सराटी इथून ही सुरुवात झाली आहे. धाराशिवमधील सभेनंतर जरांगे रात्री उशीरा करमाळा येथील मराठा बांधवांना देखील संबोधित केले.
तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी करमाळ्याच्या सभेत दिला.यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “तुम्ही नेत्यांच्या तीन-तीन पिढ्या मोठ्या केल्या.
त्यांच्या पोरांना तुम्ही साहेब म्हणता.परंतु आपल्या पोरांना त्यांची काहीच मदत झाली नाही. ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या आता सापडत आहेत. २४ डिसेंबरला कायदा पारित होऊन मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळणार आहे.
७० वर्षांमध्ये मराठ्यांना आरक्षण असतं तर जगातली सगळ्यात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा असती. आजपर्यंत कुणी ह्या नोंदी दडवून ‘ठेवल्या होत्या? ७० वर्षात आमचं वाटोळे करणारे कोण? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे,” असा सवालही त्यांनी केला.
“आमच्या नादाला लागू नका आम्हाला फक्त आरक्षण द्या. ओबीसी बांधवांना आता हे कळायला लागलंय आणि दलित बांधवांनाही लक्षात आलेलं आहे की, मराठास माजाच्या नोंदी सापडल्या आहेत; याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून ते नेत्यांनाही सांगत आहेत, विरोध करु नका.
‘मराठ्यांनी ठरवलं तर त्यांना चड्डी- बनियनसकट झोडून काढतील. त्यांना आयुष्यभर मराठे गुलाल लागू देणार नाहीत. जो आपल्या पोरांच्या मुळावर उठेल तो आपला नाही. आता फक्त आपल्याला पोरांचा फायदा बघायचा आहे. सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचं आहे आणि गावागावातल्या मराठ्यांना जागरुक ठेवायचं आहे.”
दरम्यान, करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
मात्र रात्री आठ वाजता होणारी सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली. तब्बल पाच ते सहा तास उशिराने सभा झाली तरी लोक त्यांची वाट पाहत होते.