लेण्याद्री येथे ऐतिहासिक बौद्ध धम्म अधिवेशन उत्साहात संपन्न; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांची उपस्थिती   

1 min read

लेण्याद्री दि.१४:- लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम यांच्या वतीने पुणे विभागीय बौद्ध धम्म अधिवेशन लेण्याद्री, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आयु.प्रकाश ओव्हाळ होते.या अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्षभा रतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांचे अधिवेशनास संबोधन व मार्गदर्शन होते.

सदर कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा पूर्व – पश्चिम, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर,कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर आदी विभागातून भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी व साधारण ३००० बौद्ध उपासक व उपासीका उपस्थित होते.

या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी आयु. एस. के.भंडारे साहेब हे होते. या अधिवेशन प्रसंगी भारतिय बौद्ध महासभेचे आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे तसेच  महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आयु.भिकाजी कांबळे,समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु.दादासाहेब भोसले,असिस्टंट लेफ्टनंट जनरल सचिव आयु. असिस्टंट लेफ्टनंट जनरल आयु.पी. एस.ढोबळे आदी मान्यवरांसह पूज्य भंतेगणही उपस्थित होते.

या विभागीय अधिवेशनाच्या अगोदर लेण्याद्री येथील बौद्धलेणींना आदरणीय डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी भेट दिली. यानंतर जुन्नर शहरातून आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या स्वागतासाठी सवाद्य नेत्रदीपक भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या धम्मरॅलीमध्ये हजारो लोकांचा जनसमुदाय व सर्व जाती – धर्माचे, पंथाचे लोक उपस्थित होत. घोडे, उंट व अश्वरथासह रॅलीमध्ये फटाक्यांची आकर्षक आतषबाजी हे रॅलीचे आकर्षण ठरले. या धम्म रॅलीदरम्यान जुन्नर शहरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले.

आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. भिमराव आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांचे कसे अतूट नाते होते हे सांगितले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे.

त्या छत्रपतींची जन्मभूमी आणि तथागत बुद्धांची धम्मभुमी अशा जुन्नर तालुक्यात मला यायला उशीर झाला अशी खंत त्यांनी अधिवेशनाच्या वेळी व्यक्त केली.देशातील सर्व लेण्यांना जागतिक वारसा व दर्जा मिळाला तर खऱ्या अर्थाने त्यांचे संरक्षण होईल असे मत त्यांनी मांडले.

या देशातील सुज्ञ नागरिकांनी सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेऊन घटनाविरोधी शक्तींना नाकारायला हवं असं आवाहन त्यांनी केलं.बाबासाहेबांनी जेवढ्या परिषदा घेतल्या त्यातील सर्वात जास्त परिषदा मातंग समाजासाठी घेतल्या होत्या अशी आठवण त्यांनी करून दिली.

सर्व समाज घटकांनी सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे व त्या दिशेने सर्वांचे प्रयत्न असावेत तसेच लेण्यांचे खरे वारसदार आपण आहोत म्हणून आपला वहिवाट लेण्यांवर असणे गरजेचे आहे असा त्यांनी सल्ला दिला.G 20 च्या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी बौद्ध विद्यापीठांच्या प्रतिकृतीचे दर्शन इतर देशांना दिले हीच खरी ओळख देशाची आहे असे त्यांनी सांगितले.

म्हणून धम्म चळवळ संकोचीत न ठेवता सर्व समावेशक व्हायला हवी असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला व डॉ. भिमराव आंबेडकर यांनी आपल्या संबोधनातून आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे प्रबोधन व मार्गदर्शन केले. अधिवेशन यशस्वी झाल्याचा दाखला देत, सर्व आयोजकांचे त्यांनी आभार व्यक्त केले. या अधिवेशनाची सुरुवात समता सैनिक दलाच्या नेत्रदिपक संचलनाने झाली.

अधिवेशनाचे यजमानपद हे भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका यांच्याकडे होते. अधिवेशन प्रसंगी मा.विक्रीकर आयुक्त आणि जुन्नर तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष आयु. के. बी.वाघमारे यांचा विशेष सत्कार डॉ.भीमराव साहेबांच्या हस्ते करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम व त्याअंतर्गत असणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, खेड उत्तर, खेड दक्षिण, मावळ उत्तर, मावळ दक्षिण, मुळशी, देहूरोड शहर, आळंदी शहर इत्यादी तालुक्यांच्या कार्यकारीणी यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांचे स्वागत तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष आयु. राकेश सुदाम डोळस यांनी केले.

अधिवेशनाची सुरुवात अरविंद पंडित (पर्यटन सचिव भारतिय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम) यांच्या स्वरचित स्वागत कवितेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.भगवान शिंदे (संस्कार सरचिणीस पुणे जिल्हा पश्चिम) यांनी केले तर आभार आयु.आतिश उघडे (संस्कार सचिव पुणे जिल्हा पश्चिम) यांनी मानले.

या अधिवेशन प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका कार्यकारणी यांच्या वतीने डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना जुन्नर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध विहार, नारायणगाव शासकीय विश्रामगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व जुन्नरमधील सर्व लेणींचे संवर्धन व सुशोभीकरण व्हावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जुन्नर तालुका व संपूर्ण पुणे जिल्हातील विविध राजकीय, सामाजिक संघटना त्यांचे पदाधिकारी व समाजातील मान्यवर मंडळीचे बहुमोल योगदान लाभले. अधिवेशनासाठी जुन्नर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधुभगिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे