आमदार नीलेश लंके यांना अटक: लंके यांनी मंत्रालयाला ठोकले टाळे
1 min readपारनेर दि.२:- विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी आमदार नीलेश लंके यांच्यासह इतर सर्वपक्षीय मराठा आमदारांनी बुधवारी सकाळी १० वाजता मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. प्रवेशद्वार बंद झाल्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाल्यानंतर पोलीसांनी आ. नीलेश लंके यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या आमदारांना अटक केली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आ. नीलेश लंके, आ. राजू नवघरे, आ. अमोल मिटकरी, आ. राहुल पाटील, आ. कैलास पाटील, आ. विक्रम काळे, आ. चेतन तुपे, आ. बाबासाहेब आजबे, यशवंत माने, आ. बाळासाहेब पाटील, आ. दिलीप बनकर, आ. बाबाजानी दुर्रानी, आ. मोहन उबर्डे हे मंत्रालयात दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येत आ. लंके यांनी सोबत आणलेली साखळी व कुलूप काढून प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. मंत्रालय सुरू होण्याची वेळ असल्याने विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मंत्रालयात पोहचत असतानाच प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने तिथे एकच गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलन करा परंतू प्रवेशद्वार बंद करू नका अशी विनंती केली मात्र ती धुडकाविण्यात येऊन आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. आंदोलक आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी तिथे गोळा झालेल्या कार्यकर्त्यांनी बाजूस हटविले व आंंदोलन आमदारांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारास साखळी लावण्यात आली, मात्र कुलूप लावण्यात आले नसल्याने पोलीसांनी प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला त्यातून पोलीस व आमदारांमध्ये वादावादी झाली. पोलीस प्रवेशद्वार उघडू पाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर आ. लंके यांनी जवळील कुलूप साखळीला लाऊन घेतले. मंत्री संजय बनसोडे व मंत्री अनिल पाटील यांनी आंदोलक आमदारांजवळ जाऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मंत्रयांची विनंती धुडकाउन लावत आमदारांनी आंदोलन सुरूच ठेवले. आमदार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मंत्र्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळून आ. नीलेश लंके यांच्यासह इतर आमदारांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर सर्वांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे पोलीसांकडून अटकेची पुर्तता करण्यात येउन सर्वांना सोडून देण्यात आले.लाखो करोडो मराठा समाज रस्त्यावर उतरलेला असताना आरक्षण देण्याबाबत सरकार कोणतीही कारवाई करीत नाही. एकीकडे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे. दुसरीकडे शासनाचे कामकाज सुरू आहे. अशा परिस्थितीत आम्ही मंत्रालयाचे कामकाज होऊ देणार नाही. सरकारला विशेष अधिवेशन बोलवावेच लागेल व मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल.तुम्ही अजितदादा गटासोबत आहात, असे असतानाही विरोधी आमदारांसोबत आंदोलन करीत आहात असा प्रश्न विचारला असता मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून अनेकांनी लढा उभा केलेला आहे. सध्या जरांगे पाटलांनी अन्यत्याग केला आहे. आज मराठा समाज गावागावामध्ये पेटून उठलेला आहे. विशेष अधिवेशन बोलवून मराठयांना आरक्षण द्या अशी आमची एकच मागणी आहे. आम्ही मंत्रालय बंद केले आहे. अधिकारी, मंत्री कोणालाही आम्ही आत जाऊ देणार नाही. अजित पवार यांच्याशी आमची आरक्षणाबाबत चर्चा झाली असून या प्रश्नी ते देखील सकारात्मक आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सत्ताधारी व विरोधक यांच्यातील कटुता संपली असे म्हणता येईल का असा प्रश्न उपस्थित केला. असता शेवटी समाजाची भूमिका महत्वाची आहे. समाजाची कित्येक वर्षांची मागणी आहे. त्यामुळे कितीतरी सर्वपक्षीय आमदार या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे आ. लंके म्हणाले.