मराठा आरक्षणास आमदार निलेश लंके यांचा पाठिंबा; मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तहसिलदारांना निवेदन
1 min read
पारनेर दि.२७:- मराठा समाजासाठी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी आमदार नीलेश लंके यांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना तसेच तहसिलदारांना पत्र देत या आंदोलनास आपला पाठींबा जाहिर केला आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलने, उपोषण होत आहे. जालना जिल्हयातील आंतरवली सराटी या गावामध्ये गेली काही दिवस मनोज जरागे यांचे उपोषण सुरू होते. सरकारने त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांना मुदत दिली होती.
परंतु आता ही मुदत संपली तरी दिलेले अश्वासन पुर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे आंतरवली सराटी येथे जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्याच बरोबर राज्यातील अनेक ठिकाणी असंख्य मराठा बांधव आंदोलन, उपोषण, साखळी उपोषणास बसले आहेत.
पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने असंख्य मराठा बांधव पारनेर तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
सकल मराठा समाजाची मागणी रास्त असून या मागणीस माझा जाहीर पाठींबा असल्याचे आ. लंके यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या अंदोलनास माझा पाठींबा असल्याचे नमुद करतानाच पारनेर येथील आंदोलनास आपण प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे होते, परंतू गेली दोन दिवस मुंबई येथे कामानिमित्त असल्याने प्रत्यक्ष उपस्थित न राहू शकल्याबद्दल आ. लंके यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
असंख्य मराठा बांधवांच्या मागणीचा विचार करून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणाची शासन दरबारी तात्काळ दखल घेण्याची मागणी आ. लंके यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष नितीन आडसुळ, रा. या. औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, संदीप चौधरी, महेंद्र गायकवाड, जितेश सरडे, योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, भूषण शेलार,अनिल शिंदे,दत्ता ठाणगे,रायभान औटी,तुषार सोनावळे आदी उपस्थित होते.