तो बिबट्याचा हल्ला नव्हे तर खून; घारगाव पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या
1 min read
बोटा दि.१५:- कुरकुटवाडीतील (ता.संगमनेर) तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात अखेर पोलिसांना तब्बल १९ दिवसांनी यश आले आहे. घारगाव पोलिसांनी कसून तपासा करून या खुनाचा गुंता सोडवण्यात आला.
मयताने आरोपीच्या मैत्रिणीला सोशल माध्यमातील एका प्लेटफॉर्मवर मैत्रीची रिक्वेस्ट पाठवली होती. त्या रागातूनच सदरचा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात गावातील गणेश बबन कुरकुटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सदरचा प्रकार पठारभागातील बोटा जवळील कुरकुटवाडी या गावात घडला होता.
या गावातील सचिन भानुदास कुरकुटे हा २२ वर्षीय तरुण आपल्या घराच्या पडवीत झोपलेला असताना त्याच्या गळ्याला खोलवर जखम झालेल्या अवस्थेत त्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुरुवातीला बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाल्याचे बोलले गेले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला. आळे (ता. जुन्नर) ग्रामीण रुग्णालयात मयताची उत्तरीय तपासणी झाली. परंतु, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास विलंब लागला.
उशिराने का होईना, मात्र प्राप्त झालेल्या उत्तरीय तपासणी अहवालातून सदर तरुणाच्या गळ्यावर झालेली जखम बिबट्याच्या दातांची किंवा नखांची नव्हेतर तीक्ष्ण हत्याराची असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांना सोबत घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली.
मयत तरुणाच्या सामाजिक संबंधांसह आर्थिक व नाजूक संबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला. यासर्व गोष्टी तपासल्या जात असताना एका छोट्याशा गोष्टीतून या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
मध्यंतरीच्या काळात मयत सचिन भानुदास कुरकुटे याने आळेफाटा येथील एका तरुणीला मैत्री करण्यासाठीची विनंती (फ्रेंड्स रिक्वेस्ट) पाठवली होती. सदरची तरुणी त्याच गावातील गणेश बबन कुरकुटे (वय २१) या तरुणाची मैत्रीण असल्याने सचिनच्या कृत्याचा त्याला राग आला. त्यातून त्यांच्यात वादावादीही झाली होती.
त्याचेच पर्यवसान गणेश बबन कुरकुटे या अवघ्या २१ वर्षाच्या तरुणाने २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सचिन भानुदास कुरकुटे हा आपल्या घराच्या पडवीत झोपलेला असताना कोयत्याने त्याच्या गळ्यावर एकच वार करून त्याचा खून केला.
तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी अतिशय बारकाईने या प्रकरणाचा तपास केला असून त्याच्या निष्कर्षातून गणेश कुरकुटे याचे नाव ठळकपणे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
खुनाच्या या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, घारगावचे निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहाय्यक फौजदार एच.डी. टकले, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. चव्हाण व टीम ने केला.