दुधाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल

1 min read

बेल्हे दि.१३:- यंदा पावसाने दडी मारल्याने जुन्नर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झालाय.

अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झाली आहे. शेतीला जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. दूध दरात मोठी घसरण झाली आहे. ३४ रुपयापर्यंत गेलेले दर आता २८ रुपयावर आले आहेत. तर दुसरीकडे चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत.

दुधाळ जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना आता अवघड जात आहे.पावसाने हात आखडता घेतल्याने जनावरांचा चारा खराब झाला. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. एकूणच काय तर कर्ज काढून जनावरे खरेदी केली, मात्र चारा प्रश्नामुळे गावातील शेतकऱ्यांचा आणि दुग्ध व्यवसायिकांचं आर्थिक गणित पुरतं कोलमडलं आहे.

ज्याचा परिणाम इतरही व्यवसायांवरती झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.गेल्या तीन महिन्यात दूध दर प्रति लीटर पाच रुपयेने घसरले आहेत. दिवाळीला दूध दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. सरकारी अध्यादेशाला दूध संघांनी केराची टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे.

टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे जून महिन्यात गायींच्या दूध दरात ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. शासनाने अध्यादेश काढून कमीतकमी ३४ रुपये दरापेक्षा कमी दर देऊ नये, असे स्पष्ट केले होते. परंतु आता अध्यादेश काढल्यापासून दूध घरात घट होत आहे.

जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यात पाच रुपयांनी दूध दर कमी झाले. तर दिवाळी सणाच्या तोंडावरच मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यानेमुळे दूध संघांची मनमानी चालू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आथिर्क फटका सहन करावा लागत आहे.

तरी देखील येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल लक्षात घेता शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून चाऱ्याचं नियोजन सरकारने करणे गरजेचे असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे.

ऐन दिवाळीत दुधाचे दर कमी झाले आहेत तर पशु खाद्याचे दर वाढल्याने महिन्याचा ७०० ते ८०० रुपये खर्च वाढला आहे. दुधाचे दर कमी होतात पशु खाद्याचे दर सतत वाढत जातात. दुग्ध व्यवसायीक शेतकरी जेरीस आले असून पशुंचा खाद्य, डॉक्टर यांचा मोठा खर्च आहे. शेतकऱ्याला मिळणारा दूध दर व प्रत्यक्ष ग्राहकाला मिळणार दूध दर यात खूप तफावत आहे.”

संभाजी बांगर, दुग्ध उत्पादक शेतकरी, बेल्हे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे