उपसासिंचन योजनेसाठी आणे पठारावरील शेतकरी आक्रमक; आंदोलन सुरू
आणे दि.१७ : यावर्षी आणे पठारावर पाण्याची परिस्थिती गंभीर असून कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आणे पठार भागात ८ ते ९ हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन असून शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबविण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे.
असून लोकप्रतिनिधींनी आता तरी पुढाकार घेऊन पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा अशी मागणी सुरू असलेल्या आंदोलनात करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, कुकडीचे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे आणे पठारावरील शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी आणे पठारावरील आणे, नळवने, शिंदेवाडी, पेमदरा व आनंदवाडी येथील शेतकऱ्यांनी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून गुरुवार दि १६ पासून आणे येथे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आणे पठारावरील शेतकरी कुकडी प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी लढा देत आहेत. त्यासाठी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून स्थानिक लोक प्रतिनिधींपासून थेट मंत्रालयापर्यंत अर्ज व निवेदने सादर केली आहेत.
परंतु शासकीय पातळीवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आणे पठारावरील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आधी २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १६ नोव्हेंबर पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावर शासनाकडून ‘आपल्या मागणीची शासकीय पातळीवरून दाखल घेण्यात आली असून त्यावर लवकरच कार्यवाही सुरू होईल.
आपण आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा.’ असे पत्र पठार विकास संस्थेस देण्यात आले होते. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते, पेमदरा गावचे उपसरपंच व भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब दाते, शिंदेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य गोरख शिंदे, आणे गावचे उपसरपंच सुहास आहेर,
सामाजिक कार्यकर्ते धनंजय दाते, लक्ष्मण शिंदे, गुलाबराव आहेर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी शिंदेवाडीचे सरपंच अजित शिंदे, पेमदरा गावचे सामाजिक कार्यकर्ते मुक्ता दाते, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जुन्नर तालुका उपाध्यक्ष भास्कर आहेर, बजरंग दलाचे गोरख आहेर, सामाजिक कार्यकर्ते विजय आहेर, बाबुराव दाते, हरी आहेर, शंकर आहेर आदी कार्यकर्ते व पठारावरील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
” शेतकऱ्यांनी गुरुवार पासून आंदोलन सुरू केले आहे. दि. १६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत धरणे आंदोलन, २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत साखळी उपोषण आणि एवढ्यावर शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास २३ नोव्हेंबर पासून मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.”
विराज शिंदे, पठार विकास संस्थेचे सचिव ,आणे
“मतदानावर बहिष्कार आम्ही टाकलेलाच आहे परंतु पठारावरील तरुण चिडले असून आणे घाटातून वर पठारावर येणाऱ्या नेत्यांच्या गाड्यावर हल्ला करू”
सुहास आहेर, उपसरपंच, आणे