आरक्षणाचा निर्णय लवकर जाहीर करावा, अन्यथा पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही;- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा 

1 min read

जुन्नर दि.२१:- सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये. आरक्षणाचा निर्णय लवकर जाहीर करावा, अन्यथा पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ आयोजित सभेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की आमच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई जिजाऊंचा आशीर्वाद आहे, आपण हा लढा जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शुक्रवारी दि.२० सकाळी जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर जाऊन नतमस्तक झाले. त्यांनी पायथ्याशी पादत्राणे काढून ठेवली आणि गडावर गेले. त्यांनी गडदेवता असलेल्या शिवाई देवीची आरती केली तसेच गडावरील विविध वास्तूंची, इतिहासाची माहिती घेतली. यावेळी मराठा समाजाच्या वतीने त्यांना गडावरील पवित्र मातीचा कलश देण्यात आला.

यावेळी ते म्हणाले की, शिवजन्माने पावन झालेली ही भूमी म्हणजे देशातील सर्वांत पवित्र स्थान आहे. मावळ्यांना ऊर्जा देणाऱ्या या भूमीची माती मी कपाळी लावली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान संघर्ष आणि ऊर्जेचे स्थान आहे. मराठा समाजाच्या अनेक पिढ्या हा लढा देत असून आता ही आरपारची लढाई आहे. मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने घराघरात जाऊन आरक्षण कशासाठी मागतोय सांगुन जनजागृती करावी. आरक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी मदत करावी. तुमचं हे लेकरू तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

या वेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, देवराम लांडे आदी नेते मंडळी यांसह हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे