झेंडूचे भाव पडल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत

1 min read

बेल्हे दि.२०:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांनी श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दीपावली या सणांसाठी दुष्काळ परिस्थिती ही झेंडूचे पिक घेतले आहे. मात्र, श्रावण व गणेशोत्सव काळात फुलांना काहीच बाजारभाव मिळाला नाही आणि तीच परिस्थिती नवरात्रोत्सवातदेखील दिसून येत आहे.नवरात्रोत्सव सुरू झाला असून देखील झेंडूचे बाजारभाव पडले आहेत. सणासुदीच्या काळात चांगले दर मिळतील या आशेने दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी १ रुपया ते ४ रुपया किंमतीची फुलांची रोपे परराज्यातून तसेच जिल्ह्याच्या अनेक ठिकाणांहून आणून दुष्काळ परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी फुल शेती पिकवली. तसेच इतर जिल्ह्यातून ही फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. याचाही फटका पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात प्लास्टिक फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे नैसर्गिक फुलांना मागणी कमी होत आहे. सरकारने प्लास्टिक बंदी घातली आहे तर मग प्लास्टिक फुलांवर बंदी का घालत नाही? हा मोठा प्रश्न आहे. नवरात्रातही झेंडूला बाजसणासुदीचे एक-दोन दिवस सोडले तर फुलांना २५ ते ४० रुपये एवढाच बाजारभाव मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी झेंडूचे पीक हे मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनावर घेतले आहे. यासाठी लाखो रुपयांचे भांडवल गुंतविले आहे. बाजारभावाची साथ फुलांना मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. नवरात्र उत्सवाला सुरुवात होऊन दोन- तीन दिवस झाले. परंतु, फुलांच्या बाजारभावात म्हणावी तशी वाढ झालेलीच नाही. अनेक भागात झाडांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सध्या झेंडूच्या फुलांना किलोला ७० ते ८० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
———–
“जुलै महिन्यात एक एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली होती. ४० ते ४५ हजार रुपये खर्च झाला. झाडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. सणासुदीच्या काळात पण फुलांना अल्प दरात विकावे लागते त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. किमान ७० ते ८० रुपये भाव मिळणे अपेक्षित होते. परंतु ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे १५ ते २० हजार रुपये नुकसान होण्याचा अंदाज आहे.”

सुधाकर औटी
झेंडू उत्पादक शेतकरी,राजुरी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे