बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बालकाच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत
1 min readबेल्हे दि.१०:- आळे (ता.जुन्नर) येथील तितर मळ्यातील शिवांश अमोल भुजबळ या तीन वर्षीय मुलावर बिबट्याने सोमवार दि.०९ रोजी हल्ला करून ठार केल्यानंतर मंगळवारी वनविभागाने घटनास्थळी व परिसरात १५ ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत.१५ ठिकाणी कॅमेरे लावले असून पंधरा ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले असून सदर क्षेत्राचे थर्मल ड्रॉनद्वारे टेहळणी केली जात आहे. बिबट्याचा शोध घेतला जात असून सदर क्षेत्रात वनविभगातर्फे मार्फत २४ तास ग्रस्त घालण्यात येत असून घरोघरी जनजागृती करण्यात येत आहे. हा बिबट्या पकडे पर्यंतही शोध मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षण अधिकारी अमित भिसे यांनी दिली. दिवसभरात तालुक्याचे आमदार अतुल बेनके , शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, नेताजी डोके, प्रसन्ना डोके, जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, वनक्षेत्रपाल वैभव काकडे, सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ, दिनेश चौगुले,जीवन शिंदे यांनी भेट दिली. दरम्यान भुजबळ कुटूंबाला वनविभागाच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यातील १० लक्ष रुपयांची तातडीची मदत आमदार बेनके यांच्या उपस्थितीत चेक द्वारे भुजबळ कुटुंबियाला देण्यात आली आहे. या भागात बिबट्याची दहशत मोठी असल्यामुळे कायमस्वरूपी बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह अनेक लोक प्रतिनिधींनी केली आहे.