बेल्हे ग्रामपंचायतीची निवडणूक ठरणार लक्षवेधी
1 min read
बेल्हे दि.७:- बेल्हे (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीत सरपंचपदाची जागा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.एकूण सहा वॉर्ड असून, सर्वसाधारण महिला ६ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ जागा, मागासवर्गीय महिला १ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग २ जागा व सर्वसाधारण ६ जागा तसेच सरपंचपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
गावात अंदाजे ७ हजार ५०० मतदार आहेत. गावात गुप्त बैठका सुरू असल्याने या वेळी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आजिबात दिसत नाही. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार प्रदीप पिंगट होते, तर मुक्तादेवी पॅनेलचे उमेदवार राजाभाऊ गुंजाळ होते.
त्या निवडणुकीत पिंगट यांचा पराभव होऊन राजाभाऊ गुंजाळ हे गावचे सरपंच झाले होते. बेल्हेश्वर पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार वसंत जगताप यांचाही पराभव झाला होता. प्रदीप पिंगट यांचा कमी मतांनी पराभव झाला होता.
गेल्या काही दिवसांमध्ये बेल्हे गावचे राजकारण चांगलच तापलेलं तालुक्यातील जनतेने पाहिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे.
“कै. राजाभाऊ गुंजाळ यांच्या विचारांच्या लोकांना बरोबर घेऊन गावात कुठलाही पक्ष समोर न आणता कै.राजाभाऊ गुंजाळ यांचे विचारधारा समोर ठेवून गावच्या हितासाठी व विकासासाठी पॅनल तयार करणार आहोत.”
प्रदीप पिंगट, बेल्हे
“माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकतीने ग्रामपंचायत निवडणूक लढणार असून सम विचारी पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीची चाचपणी करण्याचे ठरले आहे. आरक्षणानुसार वार्ड वाईज इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येईल.तसेच सरपंच पदासाठी एक सुशिक्षित, प्रशासनाचा अनुभव असणारी महिला उभी करणार आहोत.
अशोक घोडके, बेल्हे