जुन्नर तालुक्यातील २६ सार्वत्रिक तर १५ पोट ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा; राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

1 min read

जुन्नर दि.४:- राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी- डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जुन्नर तालुक्यातील २६ सार्वत्रिक तर १५ पोट ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा उडणार आहे.

यामधे पांगरी तर्फे मढ, उंब्रज नंबर १, पिंपरी कावळ, बेल्हे, तांबेवाडी, बांगरवाडी, रानमळावाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, शिरोली तर्फे आळे, नारायणगाव, कांदळी, पारुंडे, बुचकेवाडी, सुकाळवेढे, पाडळी, राळेगण, धालेवाडी तर्फे मिनेर, खामगाव, खटकाळे, निमगिरी, पिंपळवंडी, वडगाव आनंद, डुंबरवाडी, आंबेगव्हाण, सांगनोरे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून मोर्चे बांधणीची तयारी सुरू झाली आहे.या निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून ५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.तसेच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आता सरपंचपद थेट जनतेतून निवडणार असल्याने सरपंच पदासाठी कोण उमेदवार असणार याचीच उत्सुकता नागरिकांना लागली आहे. तसेच उमेदवार कोण द्यायचा यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये गुप्त खलबतांसह बैठका सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे उमेदवार फायनल करण्यासाठी गावा गावांमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये बैठकांना वेग यायला सुरुवात झाली आहे. राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी समजली जाते. ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी गाव पुढार्‍यांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधीं कडूनही या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहिले जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे