आमदार निलेश लंके यांना लाईफ स्फूर्ती पुरस्काराचे पुण्यात वितरण ; नीलेश लंकेंच्या आधारामुळे हजारो कोरोना रूग्णांना जीवदान:- जयंत पाटील

1 min read

पारनेर दि.१:-कोरोना महामारीमध्ये आमदार नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात १ हजार १०० बेडची व्यवस्था करीत रूग्णांना आधार देऊन त्यांच्या मनातील भिती दुर करण्याचे महत्वाचे काम केल्याने हजारो कोरोना रूग्णांना जीवदान मिळाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

लाईक माईंडेड एनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट या संस्थेच्या वतीने राजकीय क्षेत्रातील लाईफ स्फूर्ती पुरस्कार आ. नीलेश लंके यांना शनिवारी पुण्यातील नितू मांडके सभागृहात जयंत पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी पाटील ते बोलत होते.

यावेळी चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुदामराव गोरखे गुरूजी, आयोजक ओंकार कोंढाळकर, अ‍ॅड. भूषण राऊत, आदित्य जोशी, प्रज्वल कोेंढरे, प्रद्युम्य राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, निंबळकचे सरपंच अजय लामखडे, अभयसिंह नांगरे, सुभाष शिंंदे, महेंद्र गायकवाड, नुर कुरेशी, अनिल गंधाक्ते, दत्ता ठाणगे, शुभम गलांडे, मनोज शिंदे, विकी लंके, राहुल खामकर, दत्ता होले, तुषार नरसाळे, अभी झावरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुळ प्रश्‍नांकडे आपण लक्ष देण्यास तयार नाहीत. बाकीच्याच गोष्टींमध्ये आपण गुंतलो आहोत. धर्मकांडात आपण एवढे अडकलेलो आहोत की भारतातील समस्या काय आहेत, वेळेवर न्याय मिळणे आम्ही देशातील बेरोजगारीची चर्चा करतो. आज ज्या भागात शिक्षण उत्तम आहे, त्या भागातील मुलं प्रगती करून पुढे निघून गेली. ज्या भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कमकुवत आहे, त्या भागातील विद्यार्थ्यांची प्रगती मंदावली.

मुलं अडखळली.त्याने केलेल्या अभ्यासाची दखल घेण्यासाठी बाजारात कोणीही नाही. याचा अनुभव त्या मुलाच्या आई वडिलांना तो पदवीधर झाल्यानंतर येऊ लागले. त्यामुळे शिक्षणासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.

गोरक्षनाथांचा आश्रम आमच्या शिराळयाला आहे. माझ्या मतदारसंघात किल्ले मच्छिंद्रगड असून तिथे फार सुंदर मंदिर आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याअगोदर या गडावर येऊन गेलेले आहेत. त्यामुळे लंके साहेब तुम्हालाही गडावर यायचे असेल तर तुम्ही या ! असे पाटील यांनी सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

सुट बुटातले सरपंच :- नीलेश लंके पुर्वी सरपंच होते. त्यांना मी म्हणालो, पुढच्या वीस वर्षात सुटाबुटातले सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीत दिसायला लागतील.काळ बदलतो. आम्ही पहिल्यांदा राजकारणात आलो त्यावेळी विजार, सदरा आणि टोपी असा समोर बसलेल्यांचा मोठा वर्ग होता. त्यापूर्वी फेटेवाले फार होते. आता फेटे, टोप्या, इजारी, सदरे सगळे गेलेले आहे. आता जिन्स, टी शर्ट घालणारे सरपंच आलेले आहेत. कालपरत्वे वेशभुषा बदलते. असे सांगत पाटील यांनी बदलती वेशभूषा तसेच राजकारणावर भाष्य केले. 

पुजा मोरे आपल्या पक्षात !:- पुजा मोरे या कार्यक्रमास उपस्थित आहे. बीड जिल्हयातील गेवराईची ती मुलगी आहे. तिच्या मनातही नीलेश लंकेंकडे पाहून काय काय गोष्टी येत आहेत. लढाई करणारी ती मुलगी आहे. ती सध्या आपल्या पक्षात आहे. तिचा प्रवेश झालेला आहे.असे आ. नीलेश लंके यांच्याकडे कटाक्ष टाकत पाटील यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मला पत्रकारांनी प्रश्‍न विचारला तुमच्याकडे आमदार किती आहेत ? मी म्हणालो, सगळेच आमदार माझ्याकडे येतात. भविष्यकाळात चांगलं काय आणि वाईट काय ? संपत्ती सत्ता याच्यापलीकडे जाऊन आपलं मत विचारात घेऊन पुढे गेले पाहिजे. एखाद्या व्हिआयपीला संरक्षण देण्यासाठी किती यंत्रणा वापरली जाते ? तो उठून गेल्यानंतर मागे दहा जणांची लाईन असते. हे लक्षात घ्यायला हवे असे सांगत पाटील यांनी राजकारणावरही भाष्य केले.

निलेश लंके यांचे कोरोना काळातील काम सर्वश्रुत आहे. त्यांनी उभारलेल्या शरदचंद्र कोव्हीड सेंटरला भेट देण्यासाठी मी गेलो होतो. प्रवेशद्वारावर आ. लंके यांना भेटून परतावे असा माझा विचार होता. मात्र हे महाशय म्हणाले, आता जाऊ. त्यावर मी त्यांना म्हणालो वेडे झाले का ? तरीही आग्रहाने त्यांनी मला कोव्हीड सेेंटरमध्ये नेेले. मी मास्क लाऊन सुरक्षितपणे आत प्रवेश केला.

तिथे गेल्यानंतर समजले की मनात भिती नसेल तर कोव्हीड होऊ शकत नाही. कोणतेही ओैषध घेण्याची गरज नाही हे नीलेश लंके यांच्या मनस्थितीवरून आमच्या लक्षात आले. लंके यांनी पन करीत हजारो रूग्णांना बरे करण्याचे काम केले.

आम्ही बोलायचेही नाही का ? जयंत पाटील साहेब व मी शेजारी बसलो. पाऊस पाण्याच्या गप्पा मारत होतो तेव्हा लगेच छायाचित्रकार फोटो काढू लागले. राजकारण काहीही असो आम्ही बोलायचेही नाही का ? किती बंधने ? मी म्हणतो राजकारणी माणसाला प्रसिध्दी पाहिजे असते, मात्र त्यास मर्यादा असायला हव्यात. जास्त प्रसिध्दी मिळाली की लगेच त्याच्या पाठीमागे कॅमेरामन पळू लागतात. असे लंके यांनी सांगितले.

माणसाने आपल्या जीवनात असे काही काम करावे की आपण गेल्यानंतर किमान २५ वर्षे त्याची आठवण राहिली पाहिजे. आज मी आमदार म्हणून येथे उभा आहे. जयंत पाटील नेते म्हणून बसलेले आहेत. मात्र हे सर्व शुन्य आहे. शेवटी तुम्ही माणसातला देव पहा असे आ. लंके यांनी सांगितले.

शिक्षण व आरोग्याला महत्व देणे महत्वाचे ठरते. शिक्षणासाठी वेळेवर मदत मिळाली तर तो विद्यार्थी घडणार आहे. त्याचे कुटूंब घडणार आहे. त्याची पुढची पिढी घडणार आहे. आरोग्याच्या बाबतीतही तुम्ही वेळेत मदत दिली तर एखद्याचे प्राण वाचणार आहेत. या भावनेतून मी काम करतो असल्याचे लंके म्हणाले.

मी राजकारणी असलो तरी मी शंभरटक्के समाजकार्य करतो. माझा पगारही शैक्षणिक कामासाठी खर्च करतो. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या मदतीसाठी कोणतीही मर्यादा नाही. गरजू मतदारसंघातील असो किंवा नसो त्याला मदत करण्याचीच भूमिका घेतली जाते. मतदार संघापुरती मदत करण्याची स्वार्थी भूमिका मी कधीच घेत नाही. निस्वार्थ भावनेतून काम करतो. दिवसात किमान दहा लोकांना मदत झाली पाहिजे. ही माझी भावना असते. मी वेगळं काही करत नाही. मी माझं कर्तव्य बजावतो.प्रत्येकात मी माझा भाऊ, बहिण, वडील, आई पाहतो.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे