नगर अर्बन बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने केला रद्द
1 min readनगर दि.५:- भारतीय रिझर्व्ह बँकेने एक लाखापेक्षा जास्त सभासद असणाऱ्या तसेच ३६ शाखा, एकूण ३२२.५९ कोटीच्या ठेवी असणाऱ्या नगर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा (जि.नगर) परवाना रद्द करण्याचा निर्णय काल बुधवारी घेतला आहे. आरबीआयने बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु बँकेवर विश्वास ठेवून बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी या सुरक्षित आहे. केंद्रीय निबंधक यांच्याकडून पुढील आदेश पारित झाल्यावर ठेवीदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू हाेणार आहे. तरी ठेवीदारांनी काेणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिल्लीतील केंद्रीय निंबधक कार्यालयाकडून पुढील आदेश आल्यानंतर ठेवीदारांना ठेवी परत दिल्या जाणार आहे. ठेवीदारांनी अजिबात घाबरुन जाण्याची गरज नाही. ठेवीदारांना ठेवीविषयी काही शंका असेल, तर त्यांनी बँकेच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी हे आदेश काढले आहेत. बँकिंग व्यवसायासाठी अर्बन बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. यामुळे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे पालन होत नाही.
बँक चालू ठेवणे बँकेच्या ठेवीदारांच्या दृष्टीने हितावह नाही. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ती सध्याच्या ठेवींच्या पूर्ण रकमा देऊ शकत नाही, तसेच बँकेला व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल.
बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ९५.१५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे, असे पत्रात म्हटले आहे.