१० शाळा खोल्यांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी;- आमदार नीलेश लंके
1 min readपारनेर दि.२७:- तालुक्यातील विविध गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खोल्या बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली. विविध गावांतील शाळांमध्ये १० वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. आ. लंके यांनी सांगितले की, पळशीच्या गाडयाचा झाप येथील जि. प. शाळेच्या २ वर्ग खोल्या बांधकामासाठी २४ लाख, राळेगणसिध्दी शाळेच्या २ वर्गखोल्या बांधकामासाठी २४ लाख, नांदूरपठार शाळेच्या तीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी ३६ लाख, वडझिरे येथील निघुट मळा शाळेची १ वर्ग खोली बांधकामासाठी १२ लाख. निघोजच्या पांढकरवाडी शाळेची १ वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख तर मुंगशी शाळेच्या एका वर्ग खोली बांधकामासाठी १२ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
लंके म्हणाले, या शाळांसाठी वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याचे आपल्याकडे प्रस्ताव आल्यानंतर आपण जिल्हा वार्षिक योजनेतून त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. आणखी काही शाळा खोल्यांचे प्रस्ताव असून त्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. तालुक्याच्या विविध भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अतिशय तल्लख बुध्दीचे असल्याचा आपणास अनुभव आहे. या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशिल असून शाळांच्या मागणीप्रमाणे त्या त्या सुविधा पुरविण्यासाठी आपले नियोजन आहे. यापूर्वी आपण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन तेथील सध्याच्या सुविधा, आवश्यक सुविधा आदींचा आढावा घेऊन त्याच्या नोंदी घेतलेल्या आहेत. सुविधा अथवा पैशांअभावी एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये यासाठी आपण काळजी घेत असून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शालेय साहित्य अथवा आवश्यक ती मदत आपल्या प्रतिष्ठाणमार्फत पुरविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पदवीधर झालेले अनेक विद्यार्थी वेगवेगळया स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यासाठी निघोज व कान्हूरपठार येथे अभ्यासिका उभारण्यात आल्या असून काही विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्चही उचलण्यात आला असल्याचे नमुद करीत शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड आपण करीत नसल्याचे आ. लंके यांनी सांगितले.