सचिन वाळुंज सह ३५ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; विकासाचा दृष्टिकोन ठेवून आमदार अतुल बेनके यांचं काम; सचिन वाळुंज
1 min readआळेफाटा दि.६:- वडगाव आनंद सोसायटीचे अध्यक्ष सचिन वाळुंज यांनी आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत ३० ते ३५ समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी दि.५ रोजी नारायणगाव (ता.जुन्नर) येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश केला.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वाळुंज यांना मानाचे स्थान दिले जाईल असे आमदार बेनके यांनी सांगितले.
आळे येथे रेल्वे स्टेशन होणार आहे. वडगाव आनंद येथून बाह्यवळण रस्ता जात आहे. या परिसरात वाढलेल्या नागरिकांमुळे नागरी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. सचिन वाळुंज यांनी सुचवलेली सर्व कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन आमदार बेनके यांनी दिले.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर वाळुंज म्हणाले, वडगाव आनंद, आळे, आळेफाटा, पादिरवाडी परिसरात नागरीकरण वाढले आहेत. मागील पंधरा वर्षे माजी आमदार शरद सोनवणे व मी मित्र होतो. त्यांचे निष्ठेने काम केले. मात्र, या भागातील सांडपाणी, पाणी, रस्ते आदी महत्त्वाचे प्रश्न सुटले नाहीत.
विकासाचा दृष्टिकोन ठेवून बेनके काम करत आहेत. परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे काम निष्ठेने करणार आहे. बेनके म्हणाले, कार्यकर्ता नेत्यावर विश्वास टाकतो. हा विश्वास सत्कारणी लावण्याचे काम नेत्याचे असते. फक्त भाषणे ठोकून उपयोग नाही असाही खोचक सवाल वाळुंज यांनी उपस्थित केला.
प्रवेश केलेले कार्यकर्ते शिवसेनेचे काम करत होते. यावेळी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, संचालक बाळासाहेब खिलारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, फिरोज पठाण, पापा खोत, विकास दरेकर, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजने, संचालक प्रीतम काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.