सावधान ! रस्त्यावर तळलेले पदार्थ खाताय, पहा काय म्हणतात आहार तज्ञ

1 min read

पुणे दि.१८:- पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाण्याचा मोह सर्वांनाच होतो. पावसाळ्यात वडापाव आणि भजीच्या गाड्यांवर ताव मारणाऱ्या खवय्यांची संख्या वाढलेली दिसते. पावसात चिंब भिजल्यावर गरमागरम पदार्थ आनंद द्विगुणित करतात. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये खाऊगल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘स्ट्रीट फूड’ला आगळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कधीतरी मजा म्हणून हे पदार्थ खायला हरकत नाही; मात्र, वारंवार हे पदार्थ खाल्ल्याने आपण नकळतपणे आजारांना आमंत्रण देत असतो, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.बहुतांश गाड्यांवरील अस्वच्छता, तळण्यासाठी वारंवार वापरले जाणारे खाद्यतेल आणि घटक पदार्थांची साशंक गुणवत्ता यामुळे पावसाळ्यात पोटदुखी, अपचन, अॅसिडिटी, विषबाधा, जुलाब, उलट्या अशा आजारांचे इनकमिंग वाढत आहे. बाहेरचे पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.गाडीवरील लोकांना वडापाव, भजी तळण्यासाठी लागणारे तेल फेकून देणे परवडण्यासारखे नसते. अशावेळी गाड्यावरील लोकांनी एका वेळी जेवढे लागेल तेवढेच तेल वापरायला काढल्यास त्यांचे नुकसान होणार नाही आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे ठरू शकेल.रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या गाड्यांवर मोठी तेलाची कढई ठेवलेली असते. त्यामध्ये दिवसभर भजी, वडे तळले जातात. वारंवार तेल तापत असल्याने त्याचे रासायनिक स्वरूप बदलू लागते. त्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात. अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने घशात खवखवणे, खोकला, अॅसिडिटी असा त्रास सुरू होतो. याशिवाय, शरीरावर दीर्घकालीन परिणामही होतात. एलडीएल नावाचे वाईट कोलेस्टेरॉल वाढून हृदयाला धोका निर्माण होऊ शकते. शरीराचा दाह होणे, स्थूलता, मधुमेह, संधिवात असे आजारही होऊ शकतात. त्यामुळे घरात केलेले पदार्थच खावेत.”

अर्चना रायरीकर,आहारतज्ञ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे