कास पठार फुलले; पर्यटकांची वाढली गर्दी; या वर्षी ‘हा’ नियम

1 min read

सातारा दि.८:- संततधार पावसामुळे कास पठारावरील निसर्गसौंदर्य वाढीस लागले असून फुलांच्‍या हंगामास अल्प कालावधी असला, तरी येणारे पर्यटक कास पठारासह परिसरातील ठिकाणांना भेटी देण्‍यास प्राधान्‍य देतात. या हंगामा दरम्‍यान फुलण्‍याच्‍या तयारीतील असलेल्या दुर्मिळ वनसंपदेचे नुकसान होऊ नये, यासाठी यंदा स्‍थानिक समिती मदत करत आहे. यासाठी दिवसभर मनुष्‍यबळ लागत असल्‍याने कास संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन समितीने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या स्वरूपात पन्नास रुपये शुल्क ‍आकारण्‍याचा निर्णय घेतला आहे. कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटी पासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.जागतिक वारसास्‍थळाच्‍या यादीत समावेश असणाऱ्या कास येथील पठारावरील फुलांचा नजारा सौंदर्य पाहण्‍यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्‍‍यक सुविधा पुरविण्‍यासाठी सातारा वन विभाग तसेच स्‍थानिक वन व्‍यवस्‍थापन समिती कार्यरत असते.

येणाऱ्या पर्यटकांकडून स्‍थानिकांना रोजगार प्राप्‍त होत असतानाच पठाराचे संवर्धन, संगोपनासाठी शुल्‍क आकारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. हे शुल्‍क फक्‍त फुलांच्‍या हंगामापुरतेच मर्यादित असते. सध्‍याच्‍या पावसामुळे पठारावरील फुले फुलण्‍यासाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. दुर्मिळ फुलांच्‍या हंगामास अजून अवधी आहे. कास, त्‍याठिकाणचा पाऊस, धुके, झोंबणाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेण्‍यासाठी सध्‍या राज्‍यभरातून पर्यटक येत आहेत. सुटीच्‍या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या हजारोंच्‍या घरात पोचते. दूरवरून आलेले पर्यटक कास पठारावर फिरण्‍यास परवानगी देण्‍याची मागणी वन विभाग, स्‍थानिक समितीकडे करतात. या पर्यटकांना परिसराची माहिती नसल्‍याने अनेकदा त्‍यांच्‍याकडून फुलांसह इतर निसर्गसंपदेचे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे त्‍या पर्यटकांसोबत समिती तसेच वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांना फिरावे लागते.हंगामास अवधी असतानाही पर्यटक पठारावरील कुमुदिनी तलाव, कास दर्शन गॅलरी, नैसर्गिक दगडी कमान पाहण्‍यास जात असल्‍याने त्‍यासाठीचे जास्‍तीचे मनुष्‍यबळ दररोज वापरावे लागत आहे. आठ किलोमीटरचे तात्‍पुरते कुंपण पठारावरील मानवी हस्‍तक्षेप कमी करण्‍यासाठी उभारण्‍यात आलेले लोखंडी कुंपण वन विभागाने नुकतेच हटविले. हे कुंपण हटविल्यामुळे पठारावरील हुल्‍लडबाजीच्‍या घटनांमध्‍ये वाढ होण्‍यास सुरुवात झाली. यामुळे वन विभागाने त्‍याठिकाणी मुख्‍य रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा तात्‍पुरते जाळीदार कुंपण उभारले असून, त्‍याची लांबी आठ किलोमीटर इतकी आहे. या कुंपणामुळे वन्‍यप्राण्‍यांच्‍या वावरात अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे