पंख फुटणाऱ्या एसटी बस च्या व्हायरल व्हिडीओ ची महामंडळाने घेतली दखल; विभागीय यंत्र अभियंता निलंबित
1 min read
गडचिरोली दि.२७:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच ४० वाय ५४९४ ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असतांना वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले.
यासंदर्भात सदर बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता शी. रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे, त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव बिराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पुर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
यापुढे वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सुचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.
अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.