“समर्थ पॉलिटेक्निक” व “महावितरण” यांच्यामध्ये सामंजस्य करार

1 min read

बेल्हे दि.६:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (ता.जुन्नर) व महावितरण परिमंडळ पुणे यांच्यामध्ये नुकताच रास्ता पेठ पुणे येथील प्रकाशदूत सभागृहात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.यावेळी महावितरणचे पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.राजेंद्र पवार,पुणे ग्रामीण मंडळ अधीक्षक अभियंता युवराज जरग,रास्तापेठ मंडळ अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले,कार्यकारी अभियंता (प्रशासन) धनराज बिक्कड,उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी,संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके व समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले आदि मान्यवर उपस्थित होते.वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी,ज्ञानाचे आदान प्रदान वीज सुरक्षा व महावितरणच्या विविध डिजिटल ग्राहक सेवा सुविधा आदींबाबत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून नॉलेज शेअरिंग करण्यात येणार आहे.महाविद्यालयीन शिक्षणाला व्यावहारिक ज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड देणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने महावितरण व अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात झालेल्या नॉलेज शेअरिंग सामंजस्य करारातून उत्तम अभियंते निर्माण होतील असा विश्वास महावितरणचे पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी व्यक्त केला. शैक्षणिक सामंजस्य करारा अंतर्गत महावितरण व महाविद्यालय यांच्या समन्वयाने संयुक्त परिषदा, कार्यशाळा, सेमिनार आणि चर्चासत्रांचे आयोजन, औद्योगिक भेटी, तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, आयोजित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढ व संशोधनात्मक विकास होण्यासाठी महावितरण व महाविद्यालयामध्ये परस्पर संवाद होऊन प्रशिक्षण व शिबीरे आयोजित केली जाणार आहेत.या करारानंतर तंत्रनिकेतन मध्ये एनर्जी क्लब स्थापन करण्यात येणार आहे.त्या अंतर्गत वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.या उपक्रमाचे समन्वयक डॉ.संतोष पटणी यांनी सादरीकरणाद्वारे महावितरण बदलते तंत्रज्ञान व डिजिटल ग्राहकसेवा याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे