आणे पठार उपसा सिंचन योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हिरवा कंदील; मंत्रालयात बैठक संपन्न
1 min readमुंबई दि.५:- आणे (ता. जुन्नर) पठार उपसा सिंचन योजनेबाबत बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत (मुंबई) मंत्रालयात बैठक संपन्न झाली. याप्रसंगी कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी कुकडी प्रकल्पाअंतर्गत आणे पठार उपसा सिंचन योजनेबाबत सादरीकरण केले. कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन झाल्यावर पाणी उपलब्ध होईल या अटीवर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या संबंधात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून पुढील योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच चिल्हेवाडी बंदिस्त पाईपलाईन योजनेची तिसरी सुप्रमा पवार यांनीच मंजूर केली असून त्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाची निविदा प्रक्रियेची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी अतुल बेनके यांनी पवार यांच्याकडे केली आहे. पवार यांनी ३० दिवसाच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी सदर बैठकीस महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा,वित्त व नियोजन विभागाचे वरीष्ठ अधिका-यांसह जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे) यांच्या सह माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, रोहिदास शिंदे, शिंदेवाडी सरपंच अजित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, जयसिंग औटी, अँड.संतोष आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.