गुळुंचवाडी शाळेतील मुलांनी गिरवले लोकशाहीचे धडे
1 min read
बेल्हे दि.१८:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे शनिवारी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.भारतीय लोकशाहीची संकल्पना, गुप्त मतदान पद्धत, नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य सामाजिक बांधिलकी या गुणांची विद्यार्थ्यांमध्ये जोपासना व्हावी या उद्देशाने गुळुंचवाडी शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी राहील याची शाळेतील विद्यार्थ्यांना आठवडाभर आधी माहिती देण्यात आली होती.मतदार यादी तयार करणे, उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी करणे, अर्ज माघारी घेणे चिन्हांचे वाटप करणे, प्रचार करणे अशा सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली होती. शालेय उपयोगी वस्तू पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपास, वही, पुस्तक अशा चिन्हांचे वाटप करण्यात आले होते.
शाळेतील शिक्षकांनी मतपेटी, मतदार यादी,मतपत्रिका, मतदान कक्ष, शाई या सर्व गोष्टी पूर्ण करून मतदान प्रक्रिया पूर्ण केली व मतदान अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सर्व उमेदवार व मतदार यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या संकल्पनेतून व अशोक बांगर, सरिता मटाले, ज्योती फापाळे, नूरजहा पटेल यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
मतदान समाप्तीनंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे,उपाध्यक्ष चंचल गुंजाळ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्ता गुंजाळ, प्रीती शिंदे, शांताराम भांबेरे, विजय काळे, सुषमा भांबेरे,लिंबाजी काळे, दिलीप जाधव. गुलाब काळे यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. या सर्वांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी सार्थकी शिंदे हिला सर्वाधिक मते मिळाली. तिची शालेय मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तर इयत्ता सातवीतील मयांक भांबेरे याची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली या दोघांना शाळेच्या मुख्याध्यापिका व या उपक्रमाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सविता कुऱ्हाडे यांनी पदाची शपथ दिली.
शालेय शिस्त, विद्यार्थ्यांची गुणवत्ता,स्वच्छता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल तसेच सर्व शिक्षकांशी प्रेमाने आदराने वागेन असे मुख्यमंत्री सार्थकी शिंदेने आपल्या मनोगतामध्ये म्हटले व मतदारांचे आभार मानले.यावेळी अभ्यास मंत्री क्रीडामंत्री, सांस्कृतिक मंत्री,सहल मंत्री, आरोग्य मंत्री,शिस्त मंत्री अशा मंत्र्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या. अशाप्रकारे अतिशय उत्साहवर्धक,खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात गुळुंचवाडी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.