गणेशखिंड घाटातील खुनाचा ओतूर पोलिसांकडून छडा; उबेर चालकाचा खून; आरोपी अटक
1 min read
ओतूर, दि.९:- येथील सितेवाडी गावच्या हद्दीतील गणेशखिंड घाटात उबेर चालकाचा खून करणाऱ्या आरोपीस ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी (वय २६, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे खून झालेल्या चालकाचे नाव असून, याप्रकरणी आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. टिटवाळा, जि. ठाणे)
या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ५ ते ७ मार्च दरम्यान नासीर अन्सारी हा आपल्या अर्टिगा गाडीसह
(एम.एच.०३ डी.व्ही. ६४०३) बेपत्ता होता. मयताचा भाऊ मोहम्मद अमिर अन्सारी याने ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
उबेर कंपनीकडून माहिती घेतली असता, सदर गाडी ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आरोपी आदर्श भालेराव याने टिटवाळा ते जुन्नर अशी बुक केल्याचे समोर आले. गाडीचे जीपीएस लोकेशन तपासले असता, ती जुन्नरला न जाता गणेशखिंडीत मृतदेह आढळलेल्या ठिकाणावरून पुन्हा टिटवाळ्याला गेल्याचे निष्पन्न झाले.
गाडी बेवारस स्थितीत रक्ताच्या डागांसह मिळून आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी संयुक्त तपास केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला ८ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,
अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे, उपनिरीक्षक संदीप आमणे व त्यांच्या पथकाने केली आहे.
