जागतिक पुस्तक दिनानिमित्त वळसे पाटील महाविद्यालयात ग्रंथांचे अवलोकन
1 min read
निमगाव सावा दि.२३:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील सुमारे ग्रंथांचे अवलोकन केले.
विविध विषयांवरील नवनवीन पुस्तके पाहण्याची व चाळण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस मोठी चालना मिळाली तसेच त्यांच्या बौद्धिक विकासात मोलाची भर पडली.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी मराठी विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “पुस्तके ही केवळ ज्ञानाची साधने नसून ती विचारांना दिशा देणारी आणि व्यक्तिमत्त्व घडविणारी शक्ती आहेत.
वाचनामुळे मनाची समृद्धी होते, विचारांना परिपक्वता येते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो.” त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन करत “ज्याच्या हातात पुस्तक असते, त्याच्या हातात भविष्य घडविण्याची ताकद असते” असे प्रेरणादायी उद्गार व्यक्त केले.
याप्रसंगी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय पारगाव येथील डॉ. एस. एन. इनामदार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी भोर,
प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. मंगल उनवणे, तर आभार प्रा. अजय नन्नवरे यांनी मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन ज्ञानार्जनाची प्रेरणा मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
