राज्यातील ३० नद्यांच्या जलकलशांचे पूजन ; सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

1 min read

शिर्डी दि.२३:- गोदावरी व नर्मदा या दोन पवित्र नद्यांना जोडणारी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ रविवारी शिर्डीत दाखल होणार असून, राज्यातील ३० प्रमुख नद्यांच्या जलकलशांचे पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे स्वागताचे मुख्य आकर्षण असणार आहे.जलसंपदा विभागातर्फे ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त २५ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र चोंडी व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणारी ही यात्रा श्रीक्षेत्र महेश्वर (मध्य प्रदेश) येथे पोहोचणार असून, सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास यात समाविष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रा २५ एप्रिल रोजी शिर्डीत येणार आहेत. याच वेळी राज्यातील ३० प्रमुख नद्यांचे जलकलशही शिर्डीत दाखल होतील.या सर्व जलकलशांचे सामूहिक पूजन वारकरी व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले होते. त्यांचा आदर्श लक्षात घेऊन जलसंवर्धनाबाबत लोकसहभाग वाढविणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.राज्यात दुष्काळमुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जलसंपदा विभाग विविध निर्णय घेत आहे. या उपक्रमांना लोकांचा सहभाग मिळावा आणि पाण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट व्हावे,यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.‘वारसा, विचार व विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित या यात्रेच्या स्वागतासाठी शिर्डीतील क्रीडा संकुलाच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्रीक्षेत्र चोंडी येथून निघालेली जलयात्रा अहिल्यानगर, नेवासा, श्रीरामपूर आणि पुणतांबा मार्गे शिर्डीत पोहोचणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वरहून निघालेली यात्रा संगमनेर, जोर्वे, उंबरी, आश्वी, लोणी, कोल्हार आणि राहाता मार्गे शिर्डीत दाखल होईल. मार्गावरील विविध ठिकाणी ग्रामस्थांकडून यात्रेच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!