आष्टीत विवाह जुळवण्याच्या नावाखाली बाजार; तरुणीची तीनदा विक्री; चौथ्या लग्नाच्या दडपणातून आत्महत्येचा प्रयत्न

बीड दि.९: – विवाह जुळवण्याच्या नावाखाली एका २१ वर्षीय विवाहितेचा अक्षरशः बाजार मांडल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे.अवघ्या काही दिवसांच्या अंतराने या तरुणीला तीन वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न करण्यास भाग पाडून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या पतीला आणि इतर दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पीडित तरुणी ही लातूर जिल्ह्यातील असून पतीसोबतच्या वादामुळे दोन वर्षांपासून माहेरी राहत होती. याच काळात तिचा संपर्क लातूरमधील एका महिलेशी आला. तिने तिला चांगल्या स्थळाचे आमिष दाखवून पुण्यातील हडपसरमधील एका मध्यस्थ महिलेशी ओळख करून दिली. येथूनच तिच्या छळाच्या दुर्दैवी प्रवासाला सुरुवात झाली. आरोपींनी तिला कात्रज भागात नेऊन एका व्यक्तीशी तिचे बळजबरीने लग्न लावले आणि त्याच्याकडून ५ लाख रुपये वसूल केले. हा व्यवहार येथेच थांबला नाही. पहिल्या लग्नानंतर अवघ्या १० दिवसांतच तिला पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. या दुसऱ्या व्यवहारात आरोपींनी ४.५ लाख रुपये लाटले. त्यानंतर तुळजापूर येथील एका मध्यस्थ महिलेच्या मदतीने ४ मार्च रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कानडी (बुद्रुक) येथील एका व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावून देण्यात आले. या तिसऱ्या लग्नातही आरोपींनी साडेचार लाख रुपयांची कमिशन म्हणून कमाई केली.एकामागून एक तीन विवाह लावल्यानंतरही आरोपींची हाव कमी झाली नाही. ६ मार्च रोजी आरोपींनी या तरुणीवर चौथ्या लग्नासाठी दबाव टाकला. या शोषणाला कंटाळून पीडितेने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!