फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींची गय नाही:- आयुक्त तुकाराम मुंढे
1 min read
मुंबई दि.२:- राज्यात सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईत ही माहिती दिली असून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांमधून भ्रामक तसेच फसव्या जाहिराती करणाऱ्या बड्या कंपन्यांसह त्यात
सहभागी असणाऱ्या सेलिब्रिटींवरही आता कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.२५ मे रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून मुंढे यांनी राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बेकायदेशीर गुटख्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान अनेक दुकाने सील करण्यात आली असून अनेकांना अटकही झाली आहे.
याच कारवाईचा पुढील भाग म्हणून आता फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात नागरिकांना ओढणाऱ्यांवर बडगा उगारला जाणार आहे. यामध्ये केवळ उत्पादन करणाऱ्या कंपन्याच नव्हे, तर पैशांसाठी चुकीच्या दाव्यांचा प्रचार
करणारे ब्रँड ॲम्बेसेडर आणि जाहिरातदारही तितकेच दोषी धरले जातील. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि पैशांशी खेळ खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने सेलिब्रिटींची जबाबदारी निश्चित केली आहे.
