ओझरच्या शिरपेचात मानाचा तुरा; केतन जगताप रशियात बनला ‘मिस्टर बीएसएमयू २०२६’

1 min read

ओझर दि.२:- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथील एका सुपुत्राने सातासमुद्रापार भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. रशियातील उफा (Ufa) येथील प्रसिद्ध बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी (BSMU) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केतन हेमंत जगताप याने ‘मिस्टर बीएसएमयू २०२६’ (Mr. BSMU 2026) हा किताब पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे,तब्बल ७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा मान भारतीय विद्यार्थ्याला मिळाला आहे.बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वार्षिक महोत्सवात ही मोठी स्पर्धा पार पडली. यामध्ये विविध देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. केतनची निवड भारतीय प्रतिनिधी म्हणून करण्यात आली होती.त्याने आपल्या अष्टपैलू कौशल्याने आणि आत्मविश्वा साने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्पर्धेत केतनने आपल्या टॅलेंट राऊंडमध्ये सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. केतनचा वावर, बुद्धिमत्ता आणि सादरीकरण इतके प्रभावी होते की, परीक्षकांनी कोणताही विलंब न लावता त्याला विजेता म्हणून घोषित केले. सात वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांना या किताबाने हुलकावणी दिली होती, मात्र केतनने आपल्या मेहनतीच्या जोरावर हा दुष्काळ संपवला.“हा विजय केवळ माझा नसून माझ्या देशाचा आणि माझ्या मातीचा आहे. ७ वर्षांनंतर हा किताब भारताला मिळवून देऊ शकलो याचा मला अभिमान आहे.”
— केतन हेमंत जगतापकेतनच्या या यशाबद्दल ओझरसह संपूर्ण जुन्नर तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या कामगिरी मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर संधी उपलब्ध आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!