राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान

1 min read

मुंबई दि.१५:- राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता 39 हजार 92मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात 15 हजार 908 उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणीस संबंधित ठिकाणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरवात होईल. मतदारांमध्ये 1 कोटी 81 लाख 94 हजार 292 पुरुष, 1 कोटी 66 लाख 80 हजार 449 महिला; तर 4 हजार 596 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांपैकी एकूण 3 हजार 196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा 15 डिसेंबर 2025 रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज-कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!