स्पर्धा मार्गावरील सुरक्षिततेच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करा:- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

1 min read

पुणे दि.९:-‘बजाज पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये पोलीस, आरोग्य, रस्ते विभागाची महत्वपूर्ण भूमिका आहे. स्पर्धा मार्गावरील रस्ते स्वच्छ व सुरक्षित असणे आवश्यक आहेत. आरोग्य विभागाने स्पर्धा मार्गावर आवश्यक पथके तयार ठेवावीत. पोलीस विभागाने बंद वाहतूक मार्ग व पर्यायी मार्गांबाबत जनजागृती करावी, मार्गावर दूर्घटना होण्याची शक्यता निर्माण होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे संचालक पिनाकी बैसाक तसेच जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले,

आरोग्य विभागाने पथके तैनात असलेल्या ठिकाणापासून आजूबाजूच्या २५ कि.मी. परिसरातील सर्व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असणाऱ्या दवाखान्यांची माहिती घ्यावी. रस्त्यांचे डीप क्लिनींग करावे, मार्गावरील रत्स्यांवर माहिती देणारे चिन्ह लवकरात लवकर लावावेत. ग्रामीण भागात स्पर्धा मार्गावर जनावरे येणार नाहीत यासाठी पशुसंवर्धन, वनविभाग, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांची पथके तयार करुन गावांगावांत जनजागृती करावी.१२ व १८ जानेवारीला स्पर्धेचे मॉकड्रिल घेण्यात येणार असून त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलीस विभागाने समन्वयाने नियोजन करुन मार्गनिश्चिती करावी.ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम घ्यावी. तसेच गावांगावात चांगल्या पद्धतीने स्वागत होईल याचे नियोजन करावे. शिक्षण आणि क्रीडा विभागाने आवश्यक स्वयंसेवकांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे, अन्न व औषध प्रशासनाने मार्गावरील पदार्थांचा दर्जा तपासून घ्यावा, अशा सूचनाही श्री. डुडी यांनी दिल्या.बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, पिंपरी चिंचवड, पुरंदर, बारामती, पोलीस विभाग, आरोग्य, क्रीडा, वन, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!