मतदार जनजागृतीसाठी “स्वीप धुरंधर” पुरस्काराचे आयोजन
1 min read
अहिल्यानगर दि.७:- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदानाची टक्केवारी वाढून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे यांच्या संकल्पनेतून मनपा स्वीप समितीच्या वतीने
“स्वीप धुरंधर” पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व्यक्ती, संस्था, विविध कार्यालये आणि शाळा/महाविद्यालये यांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन स्वीप समितीने केले आहे.सक्षम मतदार, दिव्यांग मतदार, वंचित महिला घटक, तृतीयपंथी मतदार, ईव्हीएम जनजागृती,
प्रभाग पद्धतीतील अ, ब, क, ड या चार मतांविषयी जनजागृती, ८५ वर्षांवरील मतदारांसाठी सुविधा, कमी मतदान असलेल्या क्षेत्रातील उपाययोजना, टपाली मतदान (Postal Ballot), शंभर टक्के मतदान, नवमतदार युवक – युवतींचा सहभाग आणि “१५ जानेवारी रोजी आपले
मतदान आहे- जरूर मतदान करा” हा संदेश इत्यादी विविध विषयांवर स्वीप उपक्रम अपेक्षित आहेत.”सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या लोकप्रिय घटना, गाणी यांचा सकारात्मक व चपखल वापर करून स्वीपमधील उपक्रमांना विविध आकर्षक नावे देण्यात आली आहेत. यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण होऊन परिणामाची व्याप्ती वाढत आहे,”
असे निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.याअंतर्गत विविध स्पर्धांचे (निबंध, चित्रकला, रांगोळी, पथनाट्य, मतदार जनजागृती गीत, मेहंदी, पोस्टर, घोषवाक्य, व्हिडिओ/रील निर्मिती इ.) आयोजन, रॅली, मतदान करण्याची शपथ घेणे, सार्वजनिक ठिकाणी (सभा, संमेलने) जनजागृती करणे,
तसेच स्वतःच्या सोशल मीडियाचा वापर मतदार जनजागृती साठी करणे यांसारख्या संकल्पना अपेक्षित आहेत. सर्व उपक्रमांमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असून, उपक्रमाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असता कामा नये.
प्रस्ताव सादर करण्याची पद्धत:सहभागी घटकांनी आपल्या प्रस्तावात कामाचा तपशील, छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, प्रमाणपत्रे आदी कागदपत्रे जोडून, त्यावर स्वतःचे/संस्थेचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करावा. हा प्रस्ताव दि. [येथे अंतिम तारीख टाका] पर्यंत एका प्रतीत खालील
पत्त्यावर समक्ष, पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे जमा करावा.
पत्ता: स्वीपनगरी, नवीन महानगरपालिका प्रशासकीय इमारत, तळमजला, छत्रपती संभाजीनगर रोड, मु.पो.ता. जि. अहिल्यानगर – ४१४००१. अधिक माहितीसाठी जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागुल (९५९५५४५५५५) यांच्याशी संपर्क साधावा.
(टीप : SVEEP – ‘Systematic Voters’ Education and Electoral Participation’ म्हणजेच निवडणूक-मतदान प्रक्रियेत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि सहभाग.)जास्तीत जास्त व्यक्ती, संस्था व कार्यालयांनी या “स्वीप धुरंधर” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत,
असे आवाहन सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे,मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण व सर्व स्वीप समिती सदस्यांनी केले आहे.
