राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला; विदर्भातील किमान तापमान सर्वाधिक कमी

1 min read

मुंबई दि.७:- राज्यात वातावरणात सतत बदल होताना पाहायला मिळत आहेत. पावसाने हजेरी लावल्यानंतर आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात अचानक घट झाली आहे. विदर्भात किमान तापमानाचा पारा ७ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीची लाट आली आहे. किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.काल म्हणजेच मंगळवारी गोंदिया येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ७.६ अंश सेल्सिअस, धुळे येथे ८ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती, ब्रह्मपुरी, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भंडारा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. राज्यात काल गारठा वाढला होता.तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, दाट धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम होती. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, निफाड, जळगाव, भंडारा या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या हवामान बदलाचा शेतपिकांवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!