आळ्यात स्वयंभू पांदीचा गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

1 min read

आळेफाटा दि.७ :- अंगारकी चतुर्थी निमित्ताने आळे येथील स्वयंभू पांदीचा गणपती मंदिरात भाविकांनी श्रीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच सुरुवात केली होती. चतुर्थी निमित्त दिवसभर पूजा, महाआरती, अभिषेक असे विविध धार्मिक विधी संपन्न झाले. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची, केळीच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.आळे (ता.जुन्नर) येथील स्वयंभू पांदिचा गणपती हे प्राचीन मंदिर असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. एकाच मंदिरात बाप्पाच्या दोन शेजारीच मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे येथे येणारे भक्त गण सांगता. नवसाला पावणारा गणपती अशी या बाप्पाची ख्याती आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला प्राचीन चाफ्याचे झाड आहे. तसेच शमि आणि मंदार हे दोन दुर्मिळ वृक्ष आहेत. बारा वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो अशी आख्यायिका आहे. तर शमि वनस्पती गणेशाला अत्यंत प्रिय असल्याने या वृक्षाची पाने गणपतीला वाहण्यासाठी वापरता. असे हे आगळे वेगळे बाप्पाचे रूप असल्याने येथे गणेश उत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी होते. अशी माहिती पुजारी प्रसाद भुजबळ यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!