“त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान

1 min read

नाशिक दि.३१:-“त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात.पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द “प्रकाशस्तंभ” ला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे कि ज्योतिर्लिंगावर “त्रिकाल पूजा” केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे ३५० वर्षांपासून चालू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!