२६ डिसेंबर पासून लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी जादा पैसे आकारावे लागणार

1 min read

मुंबई दि.२२:- भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी तिकीटाच्या भाड्यात पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बदलांमुळे लांब पल्ल्याच्या आणि विशिष्ट श्रेणीच्या रेल्वे भाड्यात वाढ होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कमी अंतर असणाऱ्या आणि उपनगरीय रेल्वे भाड्यात कोणतेही बदल होणार नाही, असेही रेल्वेने सांगितले आहे.रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रेल्वे चालविण्याचा खर्च वाढला असून खर्च आणि महसूल याच्यात ताळमेळ साधण्यासाठी आणि प्रवाशांनाही स्वस्तात प्रवासाची सुविधा मिळावी, या हेतूने ही किंचित दरवाढ करण्यात आली आहे.उपनगरीय रेल्वेच्या मासिक पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच २१५ किमीपर्यंत प्रवासासाठी सामान्य श्रेणीच्या तिकिटांसाठी दरवाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेने सांगितले की, रोज प्रवास करणारे प्रवासी आणि कमी उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ करण्यात आलेली नाही.२१५ किमीहून अधिकच्या अंतरावर धावणाऱ्या रेल्वेतील सामान्य श्रेणीच्या तिकीटांत प्रती किलोमीटर १ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी फार झळ बसणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.मेल आणि एसी एक्सप्रेस ट्रेनसाठी प्रती किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. एसी डब्यांसाठीही २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉन एसी ट्रेनमधून ५०० किमींचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला केवळ १० रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

🟢 किती महसूल मिळणार?

या किंचित दरवाढीतून भारतीय रेल्वेला चालू आर्थिक वर्षात ६०० कोटींचा महसूल मिळणार आहे. रेल्वेने पुढे असे म्हटले की, रेल्वे चालविण्याच्या खर्चात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. मनुष्यबळावरील खर्च वाढून १.१५ लाख कोटींवर गेला आहे. तर पेन्शनपोटी वर्षाला ६०,००० कोटी खर्च करावे लागतात. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ऑपरेशनल खर्च २.६३ कोटींवर पोहोचला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!