धावत्या बसने घेतला पेट; २७ प्रवासी बचावले

1 min read

अहिल्यानगर दि.६:- धावत्या खाजगी आरामबसने अचानक पेट घेतला, काही क्षणातच ही बस जळून खाक झाली. ‘बर्निंग बस’च्या या थराराने प्रवासी हादरून गेले होते. आज, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या बस मध्ये २७ प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.कन्हैया ट्रॅव्हल कंपनीची ही बस (एमएच ०९ सीव्ही ६३०९) पुण्याहून बीडकडे जात होती. लांब पल्ल्याच्या या खाजगी बस अहिल्यानगर शहरातील प्रवासी नसल्यामुळे बाह्य वळण रस्त्याने जामखेड रस्ता मार्गे बीडकडे जातात. त्यानुसार कन्हैया ट्रॅव्हल कंपनीची आराम बस अहिल्यानगर शहराजवळील बाह्यवळण रस्त्याने जामखेड रस्त्याकडे जात असतानाच अरणगाव – बांबुर्डी घुमट फाट्याजवळ आरामबसनने अचानक पेट घेतला. थंडीच्या कडाक्यामुळे प्रवासी गाढ झोपेतच होते. त्यामुळे बहुतेकांच्या लक्षात ही घटना आली नाही.चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने तातडीने प्रवाशांना झोपेतून जागे करून बसमधून खाली उतरवले. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे‌ प्रवासी घाबरून गेले होते.माहिती मिळताच अहिल्यानगर महापालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी आग विझवली. अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. यासंदर्भात नगर तालुका पोलिसांनी घटनेची नोंद केली असून आग वातानुकुनी यंत्रणेतील शॉर्टसर्किटमुळे झाला लागली असावी असा अंदाज प्राथमिक अंदाज सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी वर्तवला. कंपनीच्या चालकाला चौकशीसाठी पाचारण केले असून त्यानंतरच आगीचे अधिक कारण स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!