मातोश्री शैक्षणिक संकुलात महापरिनिर्वाण दिन साजरा

1 min read

कर्जुले हर्या दि.६:- येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये भारताच्या संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समता-न्यायाचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धा, आदर आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक मौन पाळून करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार हिंगोले यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे आणि तत्त्वज्ञानाचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच उपप्राचार्य डॉ. कृपाल पवार, सचिव किरण आहेर, अध्यक्ष मीरा आहेर, सीईओ डॉ. दीपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांवर आधारित भाषण, विचारप्रकाश आणि घोषवाक्ये सादर केली. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या “शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाची आजच्या पिढीस किती आवश्यकता आहे, यावरही विविध मान्यवरांनी मत व्यक्त केले.महाविद्यालयात दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जपणूक करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली. महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!