हुमणीच्या भुंगेर्‍यांच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर फायदेशीर

1 min read

बेल्हे दि.२:- हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विकास हरिभाऊ चव्हाण यांनी केले आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात प्रकाश सापळा उभारून त्याचे प्रात्यक्षिक सादर करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.पहिल्या पावसानंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे मोठ्या प्रमाणात जमिनीतून बाहेर पडतात व प्रकाशाकडे आकर्षित होतात.या कालावधीत प्रकाश सापळ्यांच्या साहाय्याने भुंगेर्‍यांचे संकलन केल्यास त्यांची संख्या कमी होऊन पुढील काळातील हुमणीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मोठी मदत होते. हा उपाय कमी खर्चिक,पर्यावरणपूरक आणि प्रभावी असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा अधिकाधिक अवलंब करावा, असे चव्हाण यांनी सांगितले.तसेच, पकडलेले हुमणीचे भुंगेरे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयात जमा करावेत. संकलित भुंगेर्‍यांना ₹२०० प्रति किलो दराने बाजारभाव दिला जात आहे. हुमणी नियंत्रणासाठी कारखान्याच्या वतीने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, शेतकरी बांधवांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. हुमणीची अळी ऊसाच्या मुळ्या व भूमिगत कोंब कुरतडून खाते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, ऊस वाळू लागतो. आणि अनेक ठिकाणी लागवडीत रिकाम्या जागा निर्माण होतात. प्रादुर्भाव तीव्र झाल्यास उसाच्या फुटव्यांची संख्या कमी होऊन उत्पादनात मोठी घट होते.सामान्यतः हुमणीच्या तीव्र प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात २० ते ४० टक्क्यां पर्यंत घट येऊ शकते, तर काही भागांत यापेक्षाही अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!