एक हजारांपेक्षा जास्त विमाने रद्द, प्रवाशांना नाहक त्रास
1 min read
नवी दिल्ली दि.६:- देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’ची मंगळवारपासून एक हजारांपेक्षा जास्त विमाने रद्द झाली असून, अनेक उड्डाणांना विलंब झाला. गुरुवारी दिल्ली, मुंबई, बंगळूरुसह देशातील अन्य विमानतळांवरून ५५०हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द झाली होती.
शुक्रवारीही देशभरातून ‘इंडिगो’ची ५०० विमान उड्डाणे रद्द झाली. तसेच दिल्लीतून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. ‘इंडिगो’ने प्रवाशांची माफी मागताना, रद्द झालेल्या विमान तिकिटाचे पैसे परत करण्याची घोषणाही निवेदनाद्वारे केली.
‘एफडीटीएल’ नियमांच्या दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणीमुळे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊन कामकाजावर परिणाम झाल्याचे ‘इंडिगो’कडून सांगण्यात आले होते.नागरी हवाई वाहतूकमंत्री, ‘डीजीसीए’चे अधिकारी आणि ‘इंडिगो’चे अधिकारी यांच्या गुरुवारच्या बैठकीतही ‘इंडिगो’ने हा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘डीजीसीए’ने हे नियम स्थगित करण्याची घोषणा केली. या नियमस्थगितीसह अन्य उपाययोजनांमुळे ‘इंडिगो’ची विस्कळीत विमानसेवा पुढील तीन दिवसांत पूर्ववत होईल, असे असे नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांतील गोंधळाची कारणे आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे नायडू यांनी सांगितले.
