अजित पवारांच्या इशाऱ्याने पुण्यातील ‘राजकीय दादा’ घाबरले
1 min read
पुणे दि.३०:- पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागासाठी आतापर्यंत किती निधी दिला आणि भविष्यात विकासासाठी किती निधी देणार,
हे सांगण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर दिला आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाशी लढत द्यावी लागत असल्याने अजितदादांनी जिल्ह्यातील राजकीय दादागिरी, हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला आहे.
‘दादागिरी करणाऱ्यांना सोडणार नाही’ असा इशारा अजितदादांनी दिल्याने जिल्ह्यातील राजकीय पक्षांतील ‘दादां’ची घाबरगुंडी उडाली आहे.उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी स्वतः लक्ष दिले आहे.त्यासाठी ते ठिक ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत.
गेल्या आठवड्यात बारामतीतील माळेगाव बुद्रुक येथे पहिली प्रचार सभा घेतली. त्याच दिवशी बारामती येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री पवार हे प्रचार सभा घेत आहेत.
प्रत्येक सभेमध्ये ते संबंधित नगरपरिषद किंवा नगर पंचायतीच्या भागासाठी आतापर्यंत राज्याचा अर्थमंत्री म्हणून किती निधी दिला, हे आवर्जून सांगत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ताब्यात सत्ता दिली तर आणखी किती निधी सरकारी तिजोरीतून देणार,
हे देखील जाहीरपणे मतदारांना सांगत आहेत. मतदारांना मते देण्यासाठी सरकारी निधीचा वापर करण्यात येत असल्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पवार हे प्रत्येक सभेत मतदारांना तुमच्या भागाचा विकास व्हावा असे वाटत असेल, तर तुम्ही मत द्या, मी निधी देतो असे ठामपणे सांगत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा जिल्ह्यातील राजकीय पक्षांमधील दादागिरी हा केला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षाची लढत ही भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षांबरोबर आहे. प्रामुख्याने भोर, पुरंदर. दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये
उपमुख्यमंत्री पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’समोर भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने कडवे आव्हान आहे. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपवासी झाले आहेत. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये गेले आहेत. दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल हे प्रतिस्पर्धी आहेत.
पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांचे अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
भाजपचे प्रवीण माने यांनीही गारटकर यांना पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची अडचण झाली आहे.महायुतीतील मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांतील स्थानिक राजकीय दादांकडून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर
अजित पवार यांनीही संबंधित राजकीय दादांना सोडणार नाही असा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचार सभांमध्ये दादागिरी करणाऱ्यांना सोडणार नाही असा गर्भित इशारा देत आहेत.अजित पवारांच्या या इशारांमुळे जिल्ह्यातील राजकीय दादांची घाबरगुंडी उडाली आहे.
अजितदादांकडून या दादांना दिल्या जाणाऱ्या उघड आव्हानाची सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार हे काय करू शकतात, याची चांगलीच जाण असल्याने संबंधित राजकीय दादांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
